रुग्णांना चांगल्या सेवा मिळणार कशा?

नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) वर्ग एकची १७ तर वर्ग दोनची ९.८३ टक्के पदे रिक्त आहेत. तर वर्ग तीन आणि चार संवर्गातीलही १३४ पदे रिक्त असल्याने गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा मिळणार कशा? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

मेडिकलमध्ये सर्व अद्ययावत सुविधा असल्याचा दावा वैद्यकीय शिक्षण खात्यासह सत्ताधारी पक्षातील राजकीय पुढाऱ्यांकडून होत असतो. परंतु प्रत्येक वर्षी येथे नवीन विभागांसह नवीन सुविधा वाढल्यावरही आवश्यक मनुष्यबळ दिले जात नाही. निश्चितच त्याचा फटका येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या सेवांना पडतो. माहितीच्या अधिकारात मेडिकलमध्ये वर्ग एकची १६२ पदे मंजूर असून त्यातील २८ पदे रिक्त असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे येथे १३४ अधिष्ठात्यांपासून सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक भौतिकोपचार व व्यवसायोपचाराच्या भरवशावर सेवा सुरू आहेत.

मेडिकलमध्ये वर्ग दोनची १८३ पदे मंजूर आहेत. परंतु त्यातील १८ पदे रिक्त असून केवळ १६५ सहाय्यक प्राध्यापकांपासून तर फिजीसिस्टच्या भरवशावर काम सुरू आहे. मेडिकलमध्ये वर्ग तीनचीही वरिष्ठ सहाय्यक, आरोग्य अनुशासकपर्यंतची ७३ तर वर्ग चारच्या प्रयोगशाळा परिचरपासून फर्रास संवर्गातील ६१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध वार्ड, तपासणी केंद्रांवर रुग्णांवर विविध सेवा देण्यात प्रशासनाला मर्यादा येते. तर परिचारिका संवर्गातीलही येथे बरीच पदे रिक्त असल्याने त्याचा सर्वसामान्य रुग्णांना फटका बसतो. दरम्यान शासनाने येथे स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू केले. त्यानंतर सुरुवातीला खासगी रुग्णालयांत तापाचे रुग्ण तपासलेही जात नसताना येथेच या रुग्णांवर उपचाराचा विकल्प होता. त्या काळात येथे चांगल्या पद्धतीने उपचार केले गेल्यावर या रुग्णालयांचे महत्त्व शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे निदान रुग्णांच्या हितात येथे शासन तातडीने पदे भरणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.