पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंत आकारणी

नागपूर : वस्तूची मागणी वाढली व पुरवठा मर्यादित राहिला तर दरवाढ  अटळ हा बाजारपेठेचा नियम आहे. पण पूर्वी वैद्यकीय क्षेत्र याला अपवाद होते. आता त्यातही व्यावसायिकता शिरल्याचे करोना महामारीच्या काळात पदोपदी दिसून येते. करोना बाधितांना विषाणूचा संसर्ग किती स्वरूपात झाला हे तपासण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सीटीस्कॅनचे दर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. पाचशे रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत ते आकारले जातात. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसतो आहे.

रुग्णाला भरती करायचे असेल तर सर्वप्रथम एचआरसीटी स्कोअर विचारला जातो. त्यासाठी छातीचा सीटीस्कॅन करणे आवश्यक ठरते. महामारी शिखरावर गेल्याने प्रत्येक बाधित सीटीस्कॅन करायला धावतो, त्यामुळे त्याचे मनमानी दर आकारण्यात येत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयात गरीबांना परवडेल असे पाचशे रुपये दर आहे. मात्र तेथे प्रचंड गर्दी, प्रथम टोकन घ्या, नंतर सीटीस्कॅन करा व त्यानंतर तुम्हाला अहवाल मिळतो. त्यापेक्षा थोडे अधिक दर एम्समध्ये आहे. तेथे सातशे रुपये आकारले जातात. तेथे डॉक्टरने सांगितले तेव्हाच सीटीस्कॅन केला जातो. रुग्णाच्या मागणीनुसार केला जात नाही. त्यामुळे  खासगी दवाखाने किंवा सीटीस्कॅन केंद्राकडे जाण्याशिवाय  पर्याय उरत नाही.

कुठे अडीच हजार, कुठे तीन हजार तर कुठे चार हजार रुपये आकारले जातात. ही लूट येथेच थांबत नाही. धंतोली येथील एका खासगी दवाखान्यात अडीच हजार रुपयात सीटीस्कॅन केला जातो. तो केल्यावर तेथील कर्मचारी तो डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला देतो. पुढे  काय घडणार या विषय अनभिज्ञ असलेले रुग्ण संबंधित दवाखान्यातील डॉक्टरला सीटीस्कॅनची फिल्म दाखवतो. त्यासाठी त्याच्याकडून पाचशे रुपये वेगळे घेतले जातात. काही केंद्रावर  रुग्णांना वेगवेगळ्या चाचण्या करणे किती आवश्यक आहे, हे पटवून दिले जाते. या चाचण्या केल्या तर त्यासाठी चार हजार रुपये वेगळे घेतले जातात. ज्यांच्या एचआरसीटी स्कोअर कमी आहे त्यांच्याबाबत वरील प्रक्रिया केली जाते. करोनामुळे भयभीत रुग्ण डॉक्टर म्हणेल तसे करीत आपले खिसे रिकामे करीत सुटतो.

करोना महामारीची साथ वाढत असल्याने गोरगरीबांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयात पाचशे रुपयात सीटीस्कॅनची सुविधा उपलपब्ध करून दिल्यावर अनेकांना दिलासा मिळाला होता.

तेथे गर्दी वाढली. त्यानंतर एम्सने सातशे रुपयात ही सुविधा उपलब्ध करून दिली. पण ते शहराबाहेर असल्याने अनेक रुग्णांना तेथे जाणे शक्य होत नाही. त्याचा फटका रुग्णांना बसतो. स्थानिक प्रशासनाने एचआरसीटी स्कॅनच्या दरात एकसूत्रता आणावी, अशी मागणी रुग्णांकडून केली जात आहे.