नागपूर विभागात ४३६ परीक्षा केंद्रांवर १ लाख ८० हजार २०० विद्यार्थी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. विदर्भात नागपूर विभागीय मंडळातून ४३६ परीक्षा केंद्रांवर १ लाख ८० हजार २०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात ९१ हजार ४६४ विद्यार्थी व ८८ हजार ७७६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. विज्ञान शाखेत ७१ हजार २०९, वाणिज्य शाखेत २४ हजार १६५, विज्ञान शाखेत ७५ हजार ९२६ व द्विलक्षी अभ्यासक्रमात ८ हजार ९०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नागपूर विभागात ६६ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली असून या केंद्रांवर विशेष बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती केंद्राचे सहसचिव राम चव्हाण यांनी दिली.

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नागपूर विभागीय मंडळात परीक्षा मंडळातर्फे विशेष भरारी पथके नियुक्ती केलेली आहेत. त्यात मंडळाच्या १५ पथकांसह जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्रौढशिक्षण संस्था आदी संस्थांची एकंदर ७७ भरारी पथके राहणार असून मंडळाचे विशेष पथक आकस्मिक पथक म्हणून या दरम्यान काम पाहणार आहेत. परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका विविध तालुक्यांमध्ये पाठविल्या असून त्या कस्टोडियनच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. नागपूर विभागात ८२ कस्टोडियन राहणार आहेत.

इंग्रजी विषयासाठी बहुसंच प्रश्नपत्रिका असून पाठय़पुस्तकावर आधारित प्रश्नांमध्ये ३० टक्केपर्यंत फरक असू शकेल. तोंडी परीक्षा आणि पर्यावरण विषयासंबंधी परीक्षा शाळांनी घेतल्या असून त्यांचे गुणांकन शाळेतील शिक्षकांनीच केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अध्ययन अक्षम (डिस्लेक्सिया, डिसकॅलक्युलिया, डिसग्राफिया) विद्यार्थ्यांना (सर्व शाखांतील) गणित विषयांसाठी आणि वाणिज्य शाखेतील लेखाकर्म या विषयासाठी कॅलक्युलेटर वापरता येतील. परीक्षेत होणारे गैरप्रकार बघता काही संवेदनशील केंद्रांवर व्हिडिओ चित्रण केले जाणार आहे. कॉपी पुरविणे किंवा विद्यार्थ्यांना त्यासाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर व संबंधित केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. या परीक्षेसाठी मंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचे क्रमांक पुढीलप्रमाणे- नागपूर- ०७१२-२५५३५०३, अमरावती- ०७२१-२६६२६०८. परीक्षा केंद्रावर शिक्षकांनी मोबाईलचा वापर करून नये. आवश्यक काम असेल, तर परीक्षा केंद्राबाहेर येऊन कार्यालयात येऊन संवाद साधावा. परीक्षा सुरू असताना शिक्षकांनी मोबाईलचा उपयोग करून नये, अशी सूचना मंडळाने केली आहे.

परीक्षा केंद्रांवर स्मार्टफोनला बंदी

परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणण्याची परवानगी नाही. विद्यार्थ्यांजवळ तो आढळल्यास जप्त करण्यात येईल किंवा परीक्षा केंद्राबाहेर स्वत:च्या जबाबदारीवर ठेवावा लागेल. मोबाईल हरवला, तर परीक्षा केंद्र त्याला जबाबदार राहणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल आणून नये, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. शिवाय, शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. ही परिस्थिती लक्षात विद्यार्थ्यांनी किमान तासभर आधीच परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे. एखाद्या केंद्रावर बैठक व्यवस्थेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता बघता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर तासभरापूर्वी पोहोचावे.