उच्च शिक्षणाच्या प्रवेशाला मुकण्याची शक्यता

नागपूर : इयत्ता बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी राज्य शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर होताच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. मात्र, यंदा निकाल जाहीर होऊनही अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. करोनाचा वाढता संसर्ग बघता यंदा बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होण्याची शक्यता धुसर असल्याची शक्यता शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. फेरपरीक्षेवर तूर्तास कुठलाही निर्णय झालेला नसल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून जुलै-ऑगस्ट महिन्यात फेरपरीक्षा घेतली जाते. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगेच उच्चशिक्षणाची संधी मिळते. मात्र, यंदा करोनामुळे विद्यापीठ परीक्षा रद्द झाल्या. तर, राज्य मंडळाचा बारावीचा निकाल दीड महिने उशिरा जाहीर झाला. दहावीचा निकाल जुलैअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. करोनाचे वाढते संक्रमण बघता ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही फेरपरीक्षा घेणे शक्य नाही.

यंदा मंडळाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकातदेखील या परीक्षांचा उल्लेख नाही. त्यामुळे या परीक्षा पुन्हा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.  शैक्षणिक वर्षांची सुरुवात झाल्याने त्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळणार  नाही. त्यामुळे यंदा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.

दहावीचा निकाल जुलैअखेर :- यंदा करोनामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम विलंबाने होत आहे. त्यामुळे दहावीचा निकाल जुलैअखेपर्यंत लागण्याची शक्यता विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.