25 October 2020

News Flash

मानवी हाडांची भुकटी कृत्रिम दात निर्मितीसाठी सर्वोत्तम

हिरडय़ांच्या आजारात जबडय़ाच्या हाडाची गळती होत असते.

शासकीय दंत महाविद्यालयाचे संशोधन

नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंत परिवेष्टनशास्त्र विभागाच्या वतीने मानवी व कृत्रिमरीत्या तयार होणाऱ्या हाडांच्या भुकटीचा कृत्रिम दात निर्मितीवर काय परिणाम होतो? यावर संशोधन करण्यात आले. त्यात मानवी हाडांची भुकटी कृत्रिम दात निर्मितीसाठी सर्वोत्तम असल्याचे पुढे आले. सोबत कृत्रिम हाडांची भुकटी ही विश्वासदर्शक नसल्याचेही निदर्शनात आले. हे संशोधन डॉ. वैभव कारेमोरे यांच्या मार्गदर्शनात झाले.

हिरडय़ांच्या आजारात जबडय़ाच्या हाडाची गळती होत असते. या रुग्णांमध्ये दातांचा आधार वाढविण्यासाठी नवीन हाडांच्या निर्मितीची गरज असते. शिवाय अत्याधुनिक दंत प्रत्यारोपणातदेखील जबडय़ाच्या हाडाची उंची वाढवण्याकरिता दंत चिकित्सेत हाडांची भुकटी (बोन ग्राफ्ट मटेरीयल) वापरली जाते. दंत वैद्यक शास्त्राच्या दंत परिवेष्टनशास्त्र विभागात या विषयांतर्गत शस्त्रक्रिया केल्या जातात. गेल्या ४० वर्षांपासून ही भुकटी वापरली जात आहे. पण शास्त्रीयदृष्टय़ा हाडांच्या भुकटीचे नैसर्गिक हाड तयार होते की ते फक्त दाताला मेकॅनिझम सपोर्ट देण्याकरिता जबडय़ात राहतात हा तिढा गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे.

शस्त्रक्रियेनंतर भुकटीचे हाडात रूपांतर झाले की नाही, हे पाण्यासाठी परत शस्त्रक्रिया करणे वैज्ञानिकदृष्टय़ा योग्य नाही. त्यासाठी मानवी पेशींचे हाडाच्या भुकटीच्या सानिध्यात होणारे बदल आणि जडण- घडण मानवी शरीराबाहेर तपासणे आवश्यक आहे. डॉ. वैभव कारेमोरे यांनी विद्यार्थी व इतर शिक्षकांच्या मदतीने हिस्लॉप स्कूल ऑफ बायोटेक्नोलॉजी विभागातील तत्कालीन शास्त्रज्ञ डॉ. देवव्रत बेडगे यांच्या नेतृत्वात या प्रकल्पावर काम सुरू केले. संशोधनात मानवी हाडांची भुकटी रुग्णाच्या हाडापासून मिळवून तसेच व्यावसायिकदृष्टय़ा उपलब्ध असलेली मानवी हाडांची भुकटी आणि कृत्रिम तयार केलेली सिलीकॉनची भुकटी यांची प्रथिने वेगळी केली.

मानवी हाडांची निर्मिती करणाऱ्या मानवी शरीरातील फायब्रोब्लास्ट या पेशींचे प्रयोगशाळेत सेललाईन तयार केले. त्यानंतर हाडांच्या भुकटीच्या प्रथिनांचे अर्क या सेललाईनमध्ये मिश्रित केले. संशोधनात हाडांच्या भुकटीच्या प्रथिनांच्या वातावरणात मानवी पेशी जिवंत राहण्याचे प्रमाण समविभाजन (वाढवणारे) असल्याचे पुढे आले. संशोधनात मानवी शरीरात रुग्णाच्या शरीरातून काढलेली भुकटी ही दंत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेकरिता सर्वोत्तम पर्याय आहे. त्या पाठोपाठ बाजारात उपलब्ध असलेली मानवी हाडांची भुकटी अल्प परिणामकारक आढळून आली. तर कृत्रिम हाडांच्या भुकटीत कुठलेही विश्वासदर्शक निकाल आढळले नाही.  या संशोधनाकरिता डॉ. आर. के. एलरीवार, डॉ. उपाध्याय, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे डॉ. वैभव कारेमोरे यांनी सांगितले.

देशात ६६ टक्के नागरिकांना हिरडय़ांच्या आजाराचा धोका

भारतात ६६ टक्के नागरिकांना हिरडय़ांचा आजारा (पायरिया ) होण्याचा धोका आहे. पैकी काळजी घेत नसलेल्या ५० टक्के जणांचे दात गळत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. या रुग्णांना वेदना होत नसल्याने ते डॉक्टरांकडे त्वरित जात नाही. परंतु दात हलायला लागणे वा ते कायमचे जाण्याची भीती मनात निर्माण झाल्यास हे रुग्ण डॉक्टरांकडे जातात, हे विशेष.

रुग्णांनी पर्याय निवडावा

दात गळालेल्या रुग्णांना कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी बरेच दातांचे डॉक्टर वेगवेगळ्या हाडांच्या भुकटीचे पर्याय देतात. त्यात कृत्रिमरीत्या तयार केलेल्या हाडांच्या भुकटीचाही समावेश असतो. ही भुकटी फार महाग असून त्याची वैद्यकीय क्षेत्रात विश्वासार्हताही नगण्य आहे. तर उलट मानवाच्या जबडय़ाच्या खालील हाडातून काढलेली भूकटी ही कृत्रिम दंत निर्मितीसाठी लाभदायक आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांच्या पर्यायाकडे दुर्लक्ष करीत स्वतच्या भुटकीचाच पर्यायाचा आग्रह धरावा.

– डॉ. वैभव कारेमोरे दंत परिवेष्टनशास्त्र विभागाचे प्रमुख, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 4:20 am

Web Title: human bone powder is best for production of artificial teeth
Next Stories
1 शालेय वस्तू खरेदीसाठी बचतगटांचा आधार
2 कंत्राटदाराच्या ‘अजब’ पत्राने सिंथेटिक ट्रॅक निर्मितीचा खोळंबा
3 मिळे सहानुभूतीचा मळा, तीव्र न भासती उन्हाच्या झळा ..!
Just Now!
X