मृतांचा सापळा ठरत असलेल्या मानवरहित रेल्वे क्रॉसिंग काढून टाकण्याच्या कालबद्ध कार्यक्रमानुसार मध्य रेल्वेचा नागपूर विभाग येत्या मार्चपर्यंत संपूर्ण मानवरहित रेल्वे क्रॉसिंग संपुष्टात आणणार आहे.
मध्य रेल्वेच्या कृती आराखडय़ानुसार मानवरहित रेल्वे क्रॉसिंग मार्च २०१७ पर्यंत पूर्णपणे काढून टाकण्यात येणार आहेत. २०१७ पयर्ंतचे उद्दिष्ट असल्याने नागपूर विभागात संपूर्ण ३२ रेल्वे क्रॉसिंग मार्च २०१६ पर्यंत धोकाविरहित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले. १९८९ रेल्वे कायद्यातील कलम १६१ नुसार रेल्वे क्रॉसिंगवर वाहन चालवणे तसेच निष्काळजीपणे रेल्वे क्रॉसिंग ओलांडणे दंडनीय गुन्हा आहे. मध्य रेल्वेच्या नियोजनानुसार लोकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने सर्व मानवरहित रेल्वे क्रॉसिंग २०१७ पर्यंत काढून टाकण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात टप्प्याटप्याने सर्व क्रॉसिंग काढून टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मार्च २०१५ पर्यंत मानवरहित २३ रेल्वे क्रॉसिंग पैकी सात रेल्वे क्रॉसिंग काढण्यात आले आहेत. आता मार्च २०१६ पर्यंत विभागातील सर्व ३२ मानवरहित आणि फाटक असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर मर्यादित उंचीचे भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात येत्या मार्चपर्यंत मानवरहित १५ रेल्वे क्रॉसिंगवर मर्यादित उंचीचे मार्ग उभारण्यात येणार आहेत. चार रेल्वे क्रॉसिंगवर फाटक तयार करण्यात येणार असून कर्मचारी नेमण्यात येतील आणि सध्या फाटक असलेल्या १४ रेल्वे क्रॉसिंगवर मर्यादित उंचीचे भुयारी मार्ग उभारून त्या रेल्वे क्रॉसिंग कायमच्या बंद करण्यात येणार आहेत.
रेल्वेने मानवरहित रेल्वे क्रॉसिंग काढण्यासाठी काही ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. काही ठिकाणी भुयारी रेल्वे मार्ग आणि काही ठिकाणी मर्यादित उंचीचे भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यातील काही तांत्रिक बाबीमुळे अनेक ठिकाणी कामे रखडली आहेत. प्रस्तावित कामांना कामांना विलंब राज्य सरकारकाडून वेळेत निधी मिळत नसल्यामुळे होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण सध्या नागपूर विभागात रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव नाही.