वाघांच्या मृत्यूचे प्रमाणही अधिक

नागपूर : मानव-वन्यजीव संघर्षांची सर्वाधिक झळ महाराष्ट्रासह उत्तरप्रदेशला बसली आहे. महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांत या संघर्षांत ७१ तर उत्तरप्रदेशातील पिलीभित आणि परिसरात ३० माणसे मृत्युमुखी पडली आहेत.

उत्तरप्रदेशातील पिलीभीत, पश्चिम बंगालमधील सुंदरबन, महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि मध्यप्रदेशातील बांधवगडच्या काही प्रदेशात मानव-वन्यजीव संघर्ष अधिक आहे. त्यामुळे याठिकाणी माणसांचे आणि वाघांच्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. मानव-वन्यजीव संघर्षांत २०१० पासून आजतागायत पिलीभित आणि परिसरात सुमारे १२ वाघांचे आणि ३० मानवी मृत्यू झाले. यातील ११ मृत्यू हे गाभा क्षेत्रात झाले आहेत. ३० मानवी मृत्यूंपैकी १९ मृत्यू हे ऑक्टोबर २०१६ ते ऑक्टोबर २०१७ या एका वर्षांताील आहेत. महाराष्ट्रात १९९६ पासून मानव-वन्यजीव संघर्षांचे प्रमाण वाढले आहे. तब्बल २३४ गंभीर संघर्षांची प्रकरणे या कालावधीत घडून आली.

२००९ पासून आजतागायत सुमारे ७१ व्यक्ती वाघाच्या संघर्षांत मृत्युमुखी पडल्या.  दोन जण जखमी झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष आताचा नाही तर त्याला सुमारे शंभर वर्षांचा इतिहास आहे. जिल्ह्यातील जवळजवळ ५० टक्के वाघ हे बाहेरच्या क्षेत्रात आहेत. सुमारे ३०० गावातील लोक अजूनही वाघाच्या दहशतीखाली आहेत. २००२ पासून सुमारे २२६ मानवी मृत्यू याठिकाणी झाले आहेत. ज्यातील १३९ मृत्यू हे वाघाच्या हल्ल्यातील आहेत, तर उर्वरित मृत्यू हे बिबट आणि रानडुकराच्या हल्ल्यातील आहेत. याच जिल्ह्यात २०१० पासून ६३ वाघांचे मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत सात वाघांना ‘समस्याग्रस्त’ घोषित करून वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत त्यांच्यावर कारवाईचे अधिकार देण्यात आले. याच महाराष्ट्रात १९९५ अंतर्गत पहिला वाघ नरभक्षक घोषित करण्यात आला. त्यानंतरच्या दहा वर्षांत २००७ मध्ये ब्रम्हपुरी येथे एका समस्याग्रस्त वाघाला ठार करण्यात आले. २०१४ मध्ये एका वाघाला तर अलीकडेच वर्षभरापूर्वी पांढरकवडा येथे एका वाघिणीला ठार करण्यात आले.

महाराष्ट्र ७० मृत्यूसह दुसऱ्या क्रमांकावर

देशातील १८ वाघ्रकेंद्रित राज्यांपैकी १२ राज्यात २०१० ते २०१८ या कालावधीत मानव-वन्यजीव संघर्षांत सुमारे ३३१ मानवी मृत्यू नोंदवण्यात आले. यातील सर्वाधिक ६४ मानवी मृत्यू हे २०१६ या एका वर्षांतील आहेत. मानवी मृत्यूत पश्चिम बंगाल ९६ मृत्यूसह पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्र ७० मृत्यूसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तरप्रदेश ६२ मृत्यूसह तिसऱ्या क्रमांकावर असून मध्यप्रदेश ५५ मृत्यूसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यासाठी एकूण ७३६.७ लाख रुपये मोबदला आतापर्यंत देण्यात आला आहे. यात महाराष्ट्र हे राज्य आघाडीवर असून ३०८ लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ उत्तरप्रदेशने १५८ लाख रुपये दिले आहेत. मध्यप्रदेश हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर असून ५८ लाख रुपये देण्यात आले आहेत.