नागरिकांच्या समस्या मात्र कायमच

नागपूर : शहरात करोनामुळे प्रतिबंधित केल्या जाणाऱ्या क्षेत्रांनी शंभरी गाठली आहे. परंतु येथील नागरिकांना आजही जीवनावश्यक वस्तूंसाठी संघर्ष करावाच लागत आहे. विशेषत: झोपडपट्टी भागात ही समस्या जास्त असून तेथे निर्बंधांमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे.

गांधीबाग व लकडगंज भागातील  व्याप्ती कमी केली असली तरी ज्या भागात कठडे आहेत तेथील लोकांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडता येत नसल्याचे दिसून आले. विशेषत: गांधीबाग झोनमध्ये जुनी मंगळवारी परिसरात ६ रुग्ण होते. त्यापैकी चार करोनामुक्त झाले तरी अजूनही २ रुग्ण या परिसरात आहेत. मंगळवारी हा परिसर दाट वस्तीचा असून अनेक छोटय़ा गल्ल्या आहेत. त्या ठिकाणी कठडे लावण्यात आले असून लोकांना रेशन दुकानात सुद्धा जाता येत नाही. या परिसरापासून १ किमी अंतरावर रेशन दुकान आहे. शिवाय सकाळी दूध व घरोघरी वर्तमानपत्र टाकणाऱ्यांना सुद्धा प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे येथील लोकांची फारच अडचण झाली आहे. याशिवाय लकडगंज झोनमध्ये हल्दीराम फॅक्टरी मागे मिनीमाता नगर ही झोपडपट्टी असून या ठिकाणी ५ करोनाबाधित आहेत. शेजारी वर्धमान नगर ही उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. येथेही कठडे लावण्यात आले असून  नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आला तेथे किराणा दुकान सुद्धा बंद ठेवण्यास सांगितले आहे. इतवारी  टांगा स्टँड परिसरात ५ रुग्ण आढळून आले होते. सध्या एकच रुग्ण रुग्णालयात दाखल आहे. तरीही परिसर बंद  आहे. विशेष म्हणजे, या परिसरात अनेक व्यापारी राहत असल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे.

अनेक परिसरांची व्याप्ती कमी केली

प्रतिबंधित भाग असलेल्या अनेक परिसराची व्याप्ती कमी करण्यात आली आहे. ज्या घरी रुग्ण असेल त्याच्या घराच्या आजूबाजूचा परिसर बंद करण्यात आला आहे. झोपडपट्टी परिसरातून लोक मोठय़ा प्रमाणात बाहेर पडत असल्यामुळे तेथील रुग्णाच्या घराकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले आहे. नियमानुसार रुग्ण घरी आल्यानंतर किमान १४ दिवस तो भाग प्रतिबंधित असतो.

– अमोल चोरपगार सहायक आयुक्त.