18 January 2019

News Flash

मुलगी तिरळी पाहते म्हणून पाच लाख मागितले

लग्न मोडणारा नवरोबा कारागृहात

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

लग्न मोडणारा नवरोबा कारागृहात

मुलगी तिरळी पाहते, तिचे डोळे बारीक आहेत. मला तिच्याशी लग्न करायचे नाही. पण, सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपये दिले तर आपण लग्न करू शकतो, अशी मागणी करणारा नवरोबा अखेर कारागृहात पोहोचला.

धीरज रवींद्र मेश्राम (२५) रा. यशोधरानगर, अमरावती असे आरोपीचे नाव असून त्याचे वडील रवींद्र मेश्राम, आई प्रतिभा मेश्राम आणि बहीण दीप्ती मेश्राम यांनाही प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. राजेश गौरीशंकर वासनिक (५३) रा. साधू मोहल्ला, इंदोरा असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांची २७ वर्षीय मुलगी उच्चशिक्षित आहे, तर आरोपी धीरज हा हैदराबाद येथील भेल कंपनीत नोकरीला आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी फिर्यादीची मुलगी बघितली व विवाह निश्चित केला. १८ फेब्रुवारी २०१८ ला साखरपुडा झाला. ३ जून ही विवाहाची तारीख निश्चित झाली.

मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नपत्रिका छापली व नातेवाईकांमध्ये वितरितही केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी धीरज व त्याच्या आईवडिलांनी मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला व मुलगी तिरळी असून तिचे डोळे बारीक असल्याचे सांगितले.

त्यामुळे हा विवाह होऊ शकत नाही. विवाह करायचाच असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी अजब मागणी त्यांनी केली. मात्र, वासनिक यांनी हुंडा देण्यास नकार दिला व पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हवालदार मनोहर पाटील यांनी  हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून नवरोबा धीरज याला अटक केली.

First Published on May 17, 2018 12:54 am

Web Title: husband in prison at nagpur