अनैतिक संबंधाला कंटाळून हातोडय़ाने वार

नागपूर : पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळलेल्या महिलेने पती मद्यधुंद  अवस्थेत असताना त्याच्या डोक्यात हातोडय़ाने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयवंतनगर परिसरात घडली. महेश पोरंडवार (४४) रा. जयंतनगर असे मृताचे नाव आहे.

ममता महेश पोरंडवार (४१) रा. भगवाननगर असे आरोपी महिलेचे नाव आहे. महेशचा वाहतूक व्यवसाय होता. पण, त्याने ट्रक, कार व इतर वाहने विकली व त्यातून मिळालेले पैसे तो व्याजाने देत होता. तो आपल्या व पत्नीच्या मालकीचे भूखंड विकण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे त्याचे ममताशी नेहमी खटके उडायचे. पाच महिन्यांपूर्वी असेच भांडण झाले. तेव्हापासून महेश  जयंतनगर परिसरात भाडय़ाने राहायचा. महेशचे  अनैतिक संबंध असल्याचा संशय ममताला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. ममतावर सध्या मानसिक उपचार सुरू असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. मुलाच्या अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्यासाठी पैशांची चणचण असल्याने गुरुवारी सायंकाळी पैसे मागण्यासाठी ती महेशच्या घरी गेली. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात ममताने लोखंडी हातोडय़ाने महेशच्या डोक्यावर वार केले. महेशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर ममताने अजनी पोलीस ठाण्यात समर्पण केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ममताला अटक केली.

औषध घेण्यासाठी बाहेर पडली अन्..

महेश घरी पैसे देत नव्हता. त्यामुळे ममता घरी जाऊ न काही रुग्णांची सेवा करायची.  तिला मानसिक त्रास असल्याचे सांगितले जात आहे. तिला डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी ती औषध विकत घेण्याचे कारण सांगून घरून निघाली व पतीच्या खोलीवर जाऊन त्याचा खून केला.