21 October 2019

News Flash

‘क्राईम पेट्रोल’ बघून पतीचा खून

यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व अतिशय शिताफीने प्रकरणाचा छडा लावत आरोपींना १२ तासांच्या आत अटक केली.

खुनातील आरोपींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी.

फेसबुकवरून मिळाला प्रियकर, चार तासांत गुन्ह्य़ाच्या छडा

अनैतिक संबंधातून एका महिलेने प्रियकरासह मिळून पतीचा गळा आवळून खून केला व त्यानंतर त्याचा मृतदेह रात्रीच्या अंधारात शहराबाहेर फेकला. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व अतिशय शिताफीने प्रकरणाचा छडा लावत आरोपींना १२ तासांच्या आत अटक केली.

रश्मी शेख पौनिकर (२८) रा. कुंदनलाल गुप्तानगर आणि  प्रज्वल रणजीत भसारे (२१) रा. नारी रोड, म्हाडा वसाहत,अशी आरोपींची नावे आहेत. शेखर रमेश पौनिक (२८) रा. कुंदनलाल गुप्तानगर, असे मृताचे नाव आहे. शेखर हा महाल परिसरात एका कापडाच्या दुकानात काम करायचा. त्याला दारू व जुगाराचे व्यसन होते. पाच वर्षांपूर्वी त्याचा विवाह रश्मीशी झाला. त्यांना एक मुलगाही आहे. पण मद्य व जुगार खेळण्याच्या सवयीमुळे रश्मी त्याला कंटाळली होती. सवयींमुळे त्याने घरातील दागिने, दुचाकी विकून टाकली होती. त्यामुळे दोघांमध्ये खटके उडायचे. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन नियमित मारहाण करायचा. सहा महिन्यांपूर्वी तिची आरोपी प्रज्वलशी फेसबुकवर ओळख झाली. ऑनलाईन चॅटिंग करताना दोघांची मैत्री आणि त्यानंतर प्रेम झाले. कालांतराने ते एकमेकांना भेटू लागले. त्यावेळी क्राईम पेट्रोल मालिका बघून तिने प्रज्वलसोबत पतीला संपवण्याची योजना आखली. गेल्या काही दिवसांपासून ते योजनेवर अंमल करण्याच्या प्रयत्नात होते.

मंगळवारी त्यांचे घरमालक आपल्या कुटुंबासह घराबाहेर गेले होते. शेखर हा मद्यधुंद होता व जेवण करून लवकर झोपला. त्यामुळे तिने प्रियकर प्रज्वल याला बोलवून घेतले. त्यानंतर त्यांनी पती झोपेत असताना त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावली व हातपाय बांधून गळा आवळला. तो मृत झाल्यानंतर त्याचा मृतदेह दुचाकीने नामदेवनगर येथील नासुप्रच्या उद्यानाजवळ फेकला. पण तिला तो मरण पावला नसावा, अशी शंका असल्याने त्याच्या उजव्या हाताची ब्लेडने नस कापली व डोके दगडाने ठेचले. पती मरण पावल्याची खात्री पटल्यानंतर ते निघून गेले. सकाळी उद्यानात फिरायला गेलेल्या लोकांना मृतदेह दिसला व त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार, सहाय्यक निरीक्षक पंकज बोंडसे, उल्हास राठोड, दीपक धानोरकर, प्रकाश काळे, विजय राऊत, विनोद सोलव, गजानन गोसावी, संतोष यादव आदींनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपास करताना पत्नीची विचारणा केली असता जबाबात विसंगतपणा होता. तिला पोलिसी हिसका दाखवला असता तिने गुन्ह्य़ाची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल.

First Published on January 10, 2019 2:35 am

Web Title: husbands kill by seeing crime patrol