मी राजकारणात चुकून आलो आहे. मला राजकारणाची आवड नाही; पण मी घाबरणारा, हरणारा नेता नाही. जे बोलतो ते करून दाखवतो. त्यामुळे अनेक प्रकल्प आज मार्गी लागले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. येथील साई सभागृहात लिज्जत पापड महिला उद्योग केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, मुळात मी नियमाने चालणारा मंत्री नाही, जनतेच्या कामासाठी मी अधिकाऱ्यांचा आदेशही मानत नाही. मी सरकारचा माणूस आहे. जनतेची कामे करणे हाच माझा खरा उद्योग आहे. नेत्यांच्या मुलांना देण्यासाठी रोजगार नसावा. तो गरजवंताला मिळाला पाहिजे. छोटय़ा उद्योगांमुळे देशातून ४९ टक्के निर्यात होत आहे. त्यातून ११ कोटी लोकांना रोजगार मिळत आहे. येत्या काळात ५ कोटी रोजगारनिर्मिती कशी होईल, ही दूरदृष्टी ठेवून आम्ही काम सुरू केले आहे. ग्रामीण भागातही आता चांगले चित्र दिसेल. लिज्जतने एका छोटय़ा उद्योगातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला आहे, असेही गडकरी म्हणाले.

लिज्जत पापड महिला उद्योग केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.