शहरात नियम धाब्यावर बसवून वाहतूक

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन विभागासह वाहतूक पोलिसांकडून विविध जनजागृतीपर उपक्रम शहरात राबवले जात आहेत, परंतु त्यानंतरही दोन्ही यंत्रणेच्या समक्ष स्टारबस, सहा व तीन आसनी ऑटोरिक्षांसह इतर वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक बहुतांश भागात होत आहे. या वाहतुकीमुळे प्रवाशांसह इतरांचाही जीव टांगणीला आहे. अपघातात कुणाचा मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नागपूरची लोकसंख्या पंचवीस लाखांवर आहे. येथे विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, आध्रप्रदेश या राज्यांतून शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा विविध कामांकरिता नागरिक येतात. शहराची लोकसंख्या प्रत्येक वर्षी वाढत असून त्यानुसार शहरातील दुचाकीसह चारचाकी वाहनांची संख्याही वाढत आहे. शहराची औद्योगिक प्रगती बघता येथे रोजगाराच्या संधी वाढत असल्याने ग्रामीणसह इतर भागातून नागरिकांचे स्थलांतरही वाढले आहे. शहरात सध्या दुचाकी वाहनांची संख्या साडेअकरा लाखांच्या जवळपास असून चारचाकी वाहनांची संख्याही सव्वा लाखाहून जास्त आहे. ही संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. सार्वजनिक प्रवासी वाहनांचाही वापर वाढत आहे.

शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची जबाबदारी स्टारबसकडे आहे. ‘स्टारबस’मध्येही किती प्रवाशांची वाहतूक करावी हे कायद्याने निश्चित करून दिले आहे, परंतु शहरातील अनेक मार्गावर प्रवासी संख्येचे नियम धाब्यावर बसवून अधिक प्रवासी वाहतूक होत आहे. त्यातच काही बसमध्ये दाराला पकडून नागरिक प्रवास करीत असल्याचे चित्र आहे. टाटा मॅजिक, ऑटोरिक्षासह इतरही संवर्गातील वाहनांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करत असल्याने कुणी खाली पडल्यास त्यांच्या जीवालाच धोका आहे. त्यातच शहरात ९ जानेवारीपासून प्रादेशिक परिवहन विभागासह वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहतूक नियम पाळण्याचे धडे नागरिकांना दिले जात आहेत.

शहरातील विविध भागात जनजागृती होत आहे, परंतु या दोन्ही विभागाच्या समक्ष सुरू असलेल्या वाहनांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे या नियम मोडणाऱ्यांना अभय आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नुकतेच महापालिकेच्या आयुक्तांनी प्रादेशिक परिवहन विभागात नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याचे धडे दिले होते, परंतु त्यांच्या आखत्यारित असलेल्या स्टारबसमध्येच प्रवाशांना लटकून प्रवास करावा लागत असल्याने या विभागातील शहरातील परिवहन व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी नाही काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकाराने नागरिकांना वाचवण्याकरिता शहर

पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागासह महापालिका काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वाहतुकीचे नियम पाळण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहतूक पोलिसांना सोबत घेत लवकरच शहरभरात नियम न पाळणाऱ्या वाहनांच्याविरोधात कारवाईकरिता प्रयत्न केले जातील. नागरिकांना सुरक्षित प्रवासाकरिता परिवहन विभाग कटिबद्ध आहे.

रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर.

शहरात परवानगी नसतानाही सहा आसनी ऑटोरिक्षांसह टाटा मॅजिक ही वाहने सर्रास प्रवासी वाहतूक करताना दिसतात. स्टारबसमध्येही नियम धाब्यावर बसवून अधिक प्रवासी वाहतूक होते. या प्रकाराने ऑटोरिक्षा चालकांवर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. ऑटोरिक्षांकडूनही काही नियम मोडले जात असले तरी पोलिसांनी या दोन्ही गटातील वाहनांवर कारवाई केल्यास ते प्रामाणिकपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करतील.

विलास भालेकर, अध्यक्ष, विदर्भ ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना, नागपूर.