आशीनगर, धरमपेठ झोनमध्ये घर, दुकांनावर जप्तीची कारवाई

नागपूर : महापालिकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंबर कसली असून मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आशीनगर व धरमपेठ झोनमधील काही घरे व दुकानांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका आर्थिक अडचणीत आहे. आठशे कोटींहून अधिक तातडीची देणी चुकती करायची आहे. दुसरीकडे मालमत्ता कराची थकबाकी शेकडो कोटींमध्ये आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी या पूर्वीही महापालिकेने प्रयत्न केले. काही योजनाही राबवल्या. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. मुंडे यांनी आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यावर महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्यावर भर दिला आहे. काही कामांनाही स्थगिती दिली आहे. आता त्यांनी थकित मालमत्ता कर वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आशीनगर झोनमधील वार्ड क्रमांक ४३,५४,५७ मधील सात  मालमत्ता धारकांनी कर न भरल्याने त्यांची घरे जप्त करण्यात आली. अशाच प्रकारची कारवाई दोन दुकानांवर करण्यात आली. कर थकवणाऱ्यांच्या घरातील कार, वातानुकूलित यंत्र, कुलर, टीव्ही, बेड तर दुकांमधील धान्य व किराणा साहित्य जप्त करण्यात आले. त्यांना कर भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. कर भरला नाही तर जप्त केलेली मालमत्ता व इतर वस्तूंचा लिलाव करण्यात येईल, असे धरमपेठ झोन कार्यालयाकडून कळवण्यात आले.

धरमपेठ झोनमध्ये सीताबर्डीतील १३ मालमत्ताधारकांनी १ लाख ८३ हजार ४३४ रुपयांचा कर थकवला होता. त्यामुळे या सर्वाना नोटीस बजावण्यात आली होती. आज कारवाई होणार होती. त्यामुळे पाच जणांनी त्यांच्याकडील एकूण १ लाख २८ हजार ९०१ रुपयांचा कर भरणा केला. त्यामुळे  कारवाई टळली. मात्र उर्वरित आठ जणांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. ही कारवाई सहायक आयुक्त प्रकाश उराडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

सुटीच्या दिवशीही कर भरण्याची सोय

महापालिकेत पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार (२९ फेब्रुवारी) व रविवारी (१ मार्च) महापालिकेची कार्यालये बंद राहणार असली तरी नागरिकांसाठी झोन कार्यालय व मुख्यालयातही कर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.