चितार ओळीतील चौथ्या पिढीचा गणेशाला आकार

बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली आहे. त्यामुळे मूर्तीकलेची दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या चितार ओळीत सध्या लगबग वाढली आहे, परंतु मूर्तिकारांमध्ये आधीसारखा उत्साह नाही. याचे मुख्य कारण, पीओपीच्या मूर्ती आहेत. पीओपीच्या गणेशमूर्तीमुळे पारंपरिक मूर्तीकला धोक्यात आली आहे, अशी खंत  चितार ओळीतील मूर्तिकार व्यक्त करीत आहेत.

सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील चितार ओळ आणि लालगंज परिसरात भोसलेकालीन मूर्तिकारांची वस्ती आहे. चितार ओळीला दीडशे वर्षांची परंपरा आहे. आज येथे मूर्तिकारांची चौथी पिढी व्यवसाय करीत आहे. येथे केवळ मातीची मूर्ती आणि इको फ्रेन्डली रंगांचाच वापर केला जातो. एक छोटी मूर्ती तयार करण्यासाठी येथील कलाकारांना पाच ते आठ दिवस लागतात, परंतु पीओपीची मूर्ती साच्याच्या मदतीने केवळ एका दिवसाला ५० तयार करता येतात. त्यामुळे या जातीवंत मूर्तिकारांचा व्यवसाय आता अडचणीत आला आहे. अपार मेहनत आणि श्रद्धेने मूर्ती तयार केल्यानंतरही ग्राहकांना प्रदूषण वाढवणाऱ्या पीओपीच्या मूर्ती आकर्षित करत असेल तर हा व्यवसाय सोडून दुसरे काम बघणेच योग्य राहील, अशी भावना येथील मूर्तिकार व्यक्त करीत आहेत.

तर चितार ओळ इतिहासजमा होईल

गेल्यावर्षी ग्राहकांनी मातीच्या मूर्ती खरेदीला बऱ्यापैकीप्रतिसाद दिला. लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता आहे. मात्र, पीओपीची मूर्ती कुठेही सहज मिळत असल्याने ग्राहक चितार ओळमध्ये येण्याचा त्रास घेत नाहीत. शिवाय या मूर्ती स्वस्त असतात. पीओपीच्या मूर्ती विक्रीवर शासनाचा अंकुश नसल्याने आमचा हा पिढीजात व्यवसाय संकटात सापडला आहे. पीओपी विक्रीवर बंदी घातली नाही तर चितार ओळ इतिहासजमा होईल.

–  प्रीतम सूर्यवंशी,  मूर्तिकार, चितार ओळ

विसर्जनासाठी टाक्या म्हणजे पीओपीला प्रोत्साहनच

आम्ही पीओपींच्या मूर्तीविक्रीवर बंदी घालण्यासाठी महापालिका अनेकदा निवेदन दिले आहे. मनपा आयुक्त, महापौर यांचीही भेट घेतली. मात्र, केवळ आश्वासन मिळाले. नाक्यावरून मूर्ती शहरात दाखल होतातच कशा, याची चौकशी झाली पाहिजे. शिवाय गणरायाच्या पीओपी मूर्तीच्या विसर्जनासाठी मनपा जागोजागी पाण्याच्या टाक्या ठेवत असते. ते एकाप्रकारे पीओपीला प्रोत्साहनच आहे.

–  विजय गायकवाड, मूर्तिकार, चितार ओळ