महेश बोकडे

कुठे व्यायामशाळा बंद, तर कुठे जुनाट साहित्यांचा वापर; शहरातील वैद्यकीय महाविद्यालयांचे असेही आरोग्यप्रेम

उपराजधानीत केंद्र व राज्य शासनाकडून संचालित अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, दंत अशी एकूण पाच महत्त्वाची वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यात शिकणाऱ्या भावी डॉक्टरांच्या शारीरिक सुदृढतेसाठी व्यायामशाळा (जिम) ही उभारण्यात आल्या आहेत. परंतु यातील काही व्यायामशाळा कुलूपबंद आहेत, तर काहींमध्ये जुनाट साहित्य असल्याने विद्यार्थी येथे पायही ठेवत नाहीत. विशेष म्हणजे, एकाही जिममध्ये प्रशिक्षित प्रशिक्षक नसून विद्यार्थ्यांचा शारीरिक सुदृढतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

उपराजधानीत वैद्यकीयशी संबंधित विविध शासकीय महाविद्यालयांमध्ये पाच हजार विद्यार्थी देशाच्या वेगवेगळ्या भागातून पदवी आणि पदव्युत्तरसह इतर शिक्षणासाठी आले आहेत. नियमानुसार या सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी जिम असणे आवश्यक आहे. त्यानुसार शासनाने सर्व महाविद्यालयांमध्ये जिम तयार करून घेतले. या जिमसाठी प्रत्येक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून जिमखाना शुल्कही आकारले जाते, परंतु आजपर्यंत शासनाने एकाही जिममध्ये प्रशिक्षित प्रशिक्षक नियुक्त केले नाही. मेडिकल आणि दंतचे जिम सोडले तर मेयो आणि आयुर्वेद महाविद्यालयातील वसतिगृहात उभारलेले जिम जुन्या साधनांवर चालत आहेत. त्यामुळे तेथे विद्यार्थी जात नाहीत.

दंतचे जिम तयार असूनही सध्या एम्स आणि दंतच्या वसतिगृहाच्या तिढय़ामुळे ते कुलूपबंद आहे. राज्यात केवळ नागपुरात मेडिकल, मेयो ही दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. या दोन्ही महाविद्यालयांच्या अखत्यारित स्वतंत्र नर्सिग कॉलेज, बीपीएमटीचे विविध अभ्यासक्रम, पदव्युत्तरचे विविध डिप्लोमासह इतरही काही अभ्यासक्रम चालतात. मेडिकलच्या अखत्यारित सुपरस्पेशालिटी रुग्णालयासह व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार ही संस्था असून येथेही पदवीसह पदव्युत्तरचे काही अभ्यासक्रम सुरू आहेत. शासकीय दंत महाविद्यालयासह आयुर्वेद महाविद्यालयातही त्यांच्या विषयाशी संबंधित पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असून अखिल  भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)मध्ये प्रथमच ५० नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिले गेले आहेत. इतक्या मोठय़ा संख्येने विद्यार्थी येथे शिक्षण घेत असताना त्यांच्या शारीरिक सुदृढतेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

दंत -एम्स वादाचा फटका

शासकीय दंत महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहात अद्ययावत जिम तयार करण्यात आले, परंतु येथील अर्धा भाग एम्सच्या विद्यार्थ्यांकडे गेल्यामुळे अद्यापही येथील जिमचे उद्घाटन झाले नही. त्यामुळे ते कुलूपबंद आहे. मध्यंतरी या वसतिगृहावरून दंत आणि एम्स प्रशासनात वाद उफाळून आला होता. त्यानंतर झालेल्या बैठकीत हे जिम दोन्ही विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी देण्याचे ठरले होते, परंतु अद्याप जिम सुरू झाले नाही. दंत प्रशासनाने जिमचे काही काम सुरू असून त्यानंतर ते दोन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

महाविद्यालयाशी संलग्नित विद्यार्थ्यांशी भेदभाव

दंतचे जिम कुलूपबंद असून एम्समध्ये जिमची व्यवस्था नाही. इतर सर्व महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना जिममध्ये व्यायाम करण्याची परवानगी आहे, परंतु या महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेल्या व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार विषयाचे महाविद्यालय, नर्सिग आणि बीपीएमटीसह इतर विद्यार्थ्यांना जिमचा वापर करू दिला जात नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसोबत भेदभाव होत असल्याचे चित्र आहे. संबंधित महाविद्यालय या विद्यार्थ्यांकडून जिमचे विद्यापीठाकडून निश्चित केलेले शुल्क घेते, हे विशेष.

निधीचा अभाव

उपराजधानीतील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात जिमसाठी नवीन साधने घेण्यासह त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था नाही. त्यामुळे निधी कुठून मिळवावा, हा प्रश्न प्रशासनासमोर असतो. मध्यंतरी आयुर्वेद महाविद्यालयात सुमारे ५०  हजार रुपयांची नवीन उपकरणे घेण्यासह जुन्या साहित्यावर खर्च केले गेले, परंतु पुन्हा जैसे थे स्थिती झाली. मेयोतही जिमसाठी निधीचा अभाव आहे.

मेडिकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत जिम तयार करण्यात आले असून तेथे सर्वच विद्यार्थी व्यायाम करतात. नर्सिग, व्यवसायोपचार व भौतिकोपचारसह इतर विद्यार्थ्यांची मागणी असल्यास त्यांनाही स्वतंत्र जिमची सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल.

– डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.