News Flash

नाशिकला दुर्लक्षून नव्या साहित्य संमेलनाचा शंखनाद!

नाशिक येथे आयोजित ९४ व्या साहित्य संमेलनाचे अद्याप काहीच ठरत नसताना साहित्य महामंडळ मात्र ९५ व्या संमेलनाच्या तयारीला लागले आहे.

नाशिकला दुर्लक्षून नव्या साहित्य संमेलनाचा शंखनाद!

स्थळ निवड समिती स्थापन करण्यासाठी ८ ऑगस्टला बैठक

शफी पठाण
नागपूर : नाशिक येथे आयोजित ९४ व्या साहित्य संमेलनाचे अद्याप काहीच ठरत नसताना साहित्य महामंडळ मात्र ९५ व्या संमेलनाच्या तयारीला लागले आहे. यासाठी ८ ऑगस्ट रोजी औरंगाबादेत महामंडळाची बैठक होत असून या बैठकीत संमेलन स्थळ निवड समिती व संमेलन मार्गदर्शक समिती गठित केली जाणार आहे. या बैठकीची विषय पत्रिका सर्व घटक संस्थांना पाठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे,  नाशिकचा विषय प्राधान्याने मार्गी लावणे आवश्यक असताना विषय पत्रिकेत मात्र नाशिकचा उल्लेख अगदी तळाशी आणि ‘नाशिक साहित्य संमेलनासंबंधीचा पत्रव्यहार’ असा त्रोटक  करण्यात आला आहे.

महामंडळाने नाशिक येथील आयोजक संस्थेला निर्वाणीचे पत्र पाठवून संमेलनाच्या आयोजनाबाबत त्यांचे म्हणणे ३१ जुलैपर्यंत कळवण्यास सांगितले होते. अद्याप त्यांच्याकडून अधिकृत उत्तर महामंडळाला मिळालेले नाही. परंतु, ते नकारार्थीच असेल असे गृहीत धरून महामंडळाने पुढच्या संमेलनाचे घोडे दामटले आहे. नाशिकमध्ये प्रत्यक्ष संमेलन होऊ शकत नसेल तर संमेलनाच्या आयोजनासाठी इतर काय पर्याय वापरले जाऊ शकतात, संमेलनच होणार नसेल तर निवडलेल्या अध्यक्षांचे पुढे काय करायचे, आयोजकांनी संमेनलाच्या नावावर सर्वसामान्य नागरिकांकडून जो निधी गोळा केला, त्याचे काय होणार याबाबत विषय पत्रिकेत ठळकपणे काहीच उल्लेख नसल्याने खुद्द घटक संस्थांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

ठाले पाटीलच अनिच्छुक?

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील स्वत:च नाशिकच्या संमेलनाबाबत अनिच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.  ‘अक्षरयात्रा’ या महामंडळाच्या मुखपत्रात ठाले पाटील यांनी संमेलनाच्या अर्थकारणावरून आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. नाशिकला हे संमेलन कोणत्याच स्वरूपात होऊ नये, असाच जणू महामंडळाचा प्रयत्न दिसत आहे. नाशिकच्या संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची निवड व्हावी, असा ठाले पाटलांचा प्रयत्न होता. परंतु, मुंबई, पुणे या घटक संस्थांनी जयंत नारळीकर यांचे नाव आग्रहाने लावून धरल्याने व ते एकमताने मान्य करवून घेतल्याने ठाले पाटलांचा नाईलाज झाला. त्यामुळे आता नाशिकच्या संमेलनाबाबत ते नकारात्क दिसत असल्याची साहित्य वर्तुळात चर्चा आहे. मराठवाडय़ाकडे आता केवळ आठ महिने महामंडळ राहणार आहे. त्यानंतर ते मुंबईकडे जाईल. या आठ महिन्यात  संमेलन वेगाने उरकण्याचे महामंडळाचे प्रयत्न असल्याचेही सांगितले जात आहे.

तात्यासाहेबांच्या कर्मभूमीत हे संमेलन प्रस्तावित आहे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून व नाशिककरांची मने दुखवून नवीन संमेलनाची तयारी करणे योग्य नाही. झालेच तर ऑनलाईन किंवा नाशिकच्या एका नाटय़गृहात मर्यादित स्वरूपात का होईना हे संमेलन व्हावे व नंतरच पुढच्या संमेलनाचा विचार केला जावा.

मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर संमेलनाचे आयोजन कठीण असल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले, असे आम्ही वृत्तपत्रातून वाचतो आहोत. परंतु नाशिककडून अद्याप अधिकृत उत्तर आलेले नाही. पण, म्हणून पुढच्या संमेलनाची चर्चा थांबवणे योग्य नाही. आठ ऑगस्टच्या बैठकीत आगामी संमेलनाबाबत चर्चा प्रस्तावित आहे.

– दादा गारे, कार्यवाह, साहित्य महामंडळ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 2:59 am

Web Title: ignoring nashik shouts of new literary convention ssh 93
Next Stories
1 पुनर्वसनाचा आदर्श उभा करणाऱ्या मेळघाटातच पुनर्वसनाला गालबोट
2 चिकित्सकांच्या आंदोलनामुळे पशुपालकांचे मरण
3 महापालिका ऐकेना, नगरसेवकही हतबल!
Just Now!
X