‘इग्नू’चे प्रादेशिक संचालक डॉ. शिवस्वरूप यांची माहिती; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

कारागृहातील बंदिवानांसाठी रेडिओद्वारे सुरू करण्यात आलेला ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ हा देशातील पहिलाच प्रयोग असून त्यामुळे बंदिवानांना स्वतंत्र अस्मिता लाभत आहे, अशी माहिती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू)चे प्रादेशिक संचालक डॉ. पी. शिवस्वरूप यांनी दिली. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

डॉ. पी. शिवस्वरूप म्हणाले, वंचित आणि दुर्बल घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी इग्नू सातत्याने प्रयत्न करीत आहे. बंदिवान, वारांगणा, नक्षलग्रस्त भागातील आदिवासी, अपंग, तृतीयपंथी या समाजातील प्रत्येक प्रवर्गाच्या घरापर्यंत इग्नू ज्ञानगंगा घेऊन जात आहे. म्हणूनच आज मोठय़ा संख्येने बंदिवान केवळ पारंपरिक विद्याशाखांनाच नव्हे तर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्येही शिक्षण घेत आहेत. रिक्षाचालकापासून ते केंद्र शासनातील अधिकाऱ्यांपर्यंत इग्नूचे विद्यार्थी आहेत. सामान्य लोकांसाठी ‘फोन इन’ कार्यक्रम ग्यानवाणीच्या माध्यमातून इग्नूने सुरू केला. आता बंदिवानांनाही हे व्यासपीठ एका समन्वयकाद्वारे उपलब्ध करण्यात आले आहे. अशाप्रकारे बंदिवानांना थेट रेडिओच्या माध्यमातून प्रश्न विचारून उत्तर मिळवण्याची सुविधा पहिल्यांदाच उपलब्ध करण्यात आली आहे.

राज्यातील एकूण १४ जिल्ह्य़ांमधील विद्यार्थी इग्नूत शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेण्यास इच्छुक असलेला प्रत्येकजण आमचा विद्यार्थी आहे. मात्र, कैदी, आदिवासी, सेक्सवर्कर, तृतीयपंथी यांच्या रोजच्या जगण्याचेच प्रश्न एवढे भीषण आहेत की त्यांचे शिक्षणाकडे लक्ष जाऊच शकत नाही. एखाद्याला शिक्षण घ्यावेसे वाटले तरी संबंधित व्यक्तीला शिक्षण घेता येणार नाही, याची काळजी इतर जण घेत असतात. इग्नूतर्फे वर्षांतून जानेवारी आणि जुलै असे दोन वेळा प्रवेश घेणे सुरू असते. गेल्यावर्षी महाराष्ट्रातील १४ जिल्ह्य़ांमध्ये ८ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. यावर्षी जानेवारीमध्ये सुमारे २ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यावर जुलैमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते. इग्नू चार भिंतींच्या आत बसून शिकवणारे विद्यापीठ नाही तर समाजाच्या बहिष्कृत, दुर्बल घटकांपर्यंत शिक्षण घेऊन जाण्यावर आमचा भर असतो.

‘स्पॅनिश’ अभ्यासक्रमाचे स्वागत

‘स्पॅनिश’ या परकीय भाषेचा अभ्यासक्रम इग्नूने गेल्या जानेवारीपासून सुरू केला आहे. यापूर्वी फ्रेंच, जर्मनी कोर्स सुरू करण्यात आला. त्याच्या जोडीलाच ‘स्पॅनिश’ अभ्यासक्रम सुरू केल्याने नागपुरातील आयटी कंपन्यांच्या प्रमुखांकडून स्वागत करण्यात आले. त्यांचे ग्राहक परदेशात असल्याने स्पॅनिश भाषकांची त्यांना गरज भासत होती.

नक्षलग्रस्त भागात विधायक कार्य

कुरखेडा तालुक्यापासून कोरची ४० किलोमीटरवर आहे. तेथून नांदली या अतिशय दुर्गम भागात जावे लागते. तो भाग नक्षलग्रस्त आहे. मात्र, आम्हाला कधीच अडचणी गेल्या नाहीत. कारण लोकांच्या हितासाठी आम्ही काम करतो. त्यामुळे घाबरायचे कारण नाही. शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असलेले नागरिक या भागात पाचपाच किलोमीटरवरून पायी येतात तेव्हा मन हेलावून जाते, याची उदाहरणेही पी. शिवस्वरूप यांनी सांगितली.