ज्योती तिरपुडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कन्ट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन आणि ट्रेड मार्क्‍स’ चा अहवाल

स्वामित्व हक्काबाबत (पेटंट) देशातील आयआयटीने बाजी मारली असून २०१६-१७ या वर्षांत सर्वाधिक ४०० पेटंट दाखल  केले असून त्यांच्याच तोडीच्या समजल्या जाणाऱ्या एनआयटीने जेमतेम २६ पेटंट दाखल केले आहेत. देशात २३ आयआयटी तर ३१ एनआयटी आहेत. महाराष्ट्रात प्रत्येकी एक आयआयटी आणि एनआयटी आहे.

राष्ट्रीय दर्जाच्या या दोन्ही संस्थांपैकी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) स्वायत्त संस्था असून त्या ‘आयआयटी परिषदे’द्वारे जोडल्या गेल्या आहेत. पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी.साठीही आयआयटीमध्ये प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर शिक्षणानंतर संशोधनाला येथे चांगला वाव आहे.

शिक्षणात दर्जा राखून असलेल्या आयआयटीत प्रवेश मिळवणे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. हा दर्जा पेटंट दाखल करण्यातही आयआयटीजने राखून ठेवला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगांतर्गत येणाऱ्या ‘कन्ट्रोलर जनरल ऑफ पेटंटस्, डिझाईन आणि ट्रेड मार्क्‍सने’ जाहीर केलेल्या २०१६-१७च्या वार्षिक अहवालात देशात पेटंट दाखल करणाऱ्या पहिल्या १० भारतीय संस्था आणि विद्यापीठांची यादी दिली आहे. त्यात आयआयटी आघाडीवर आहे तर एनआयटी १०व्या क्रमांकावर आहे. आश्चर्य म्हणजे, नागपुरातील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय ४९ पेटंट दाखल करून पाचव्या क्रमांकावर आहे.

देशातील सर्व आयआयटीतून एकूण ४०० पेटंट दाखल करण्यात आले आहेत, तर एनआयटीकडून २६ पेटंट दाखल करण्यात आली आहेत.

एनआयटीच्या पुढे असल्याचा आनंद

आम्ही २०१० पासून २०८ पेटंट दाखल केली आहेत. त्यापैकी १५० पेटंट परीक्षणासाठी गेली आहेत. साधारणत: १५ ते १८ महिन्यांचा कालावधी त्यामध्ये जातो. आपली राष्ट्रीय स्तरावरील पेटंट प्रक्रिया संथगतीने होते. कारण हजारोंच्या संख्येने पेटंट त्याठिकाणी दाखल होतात. आमच्या एकाही पेटंटला अद्याप मान्यता मिळाली नाही. मात्र, २०१९च्या अखेरीस काही पेटंट नक्कीच मिळतील, अशी खात्री आहे. तूर्त पेटंट दाखल करण्यात आम्ही एनआयटीच्याही पुढे आहोत, याचा आनंद आहे.

-डॉ. प्रीती बजाज, प्राचार्य, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय

संस्था किंवा विद्यापीठाचे नाव आणि दाखल पेटंट

१) भारतीय तंत्रज्ञान संस्था (एकत्रित)- ४००

२) अमेठी विद्यापीठ- १०६

३) भारतीय विज्ञान संस्था- ५४

४) वेलटेक हाय डॉ. आरआर अ‍ॅण्ड डॉ. एसआर- ५०

५) जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय- ४९

६) भारत विद्यापीठ- ४५

७) चंडीगड महाविद्यालय समूह- ३०

८) चित्कारा विद्यापीठ- २९

९) हिंदुस्तान तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्था- २८

१०) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एकत्रित)- २६

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit ahead of nit to file proprietary rights
First published on: 19-09-2018 at 04:30 IST