सुपारी बाजारावर ‘मामा’ची माया; केंद्रीय यंत्रणांकडून तस्करांविरुद्ध कठोर कारवाईची गरज

मंगेश राऊत, लोकसत्ता

नागपूर : जगभरात करोनाने थमान घातल्यानंतर टाळेबंदी जाहीर करण्यात आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला मोठा फटका बसला. आंतरराष्ट्रीय सीमा बंद करून अनेक देशांमधून आयात-निर्यात बंद करण्यात आली. यात इंडोनेशिया व म्यानमार या देशांनीही आपल्या सीमा बंद करून ठेवलेल्या असताना उपराजधानीत मोठय़ा प्रमाणात इंडोनेशियाची सडकी सुपारी येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून केंद्रीय यंत्रणांनी या तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

देशातील सर्वात मोठी सुपारीची बाजारपेठ ही नागपुरात आहे. येथून देशभरातील अनेक गुटखा कंपन्यांना सुपारी, कत्रण, चणा आदींचा पुरवठा होतो. देशांतर्गत सुपारीचे उत्पादन केरळ व काही दक्षिणच्या राज्यांमध्ये होते. भारतीय सुपारीचे दर अधिक असतात. सुपारी व्यापारी अधिक नफा कमावण्यासाठी इंडोनेशिया सुपारीची भारतात तस्करी करतात. याचे सर्वात मोठे हब सिलचर व परिसरात आहे. या ठिकाणी इंडोनेशियात कचऱ्याप्रमाणे उगणारी सुपारी म्यानमारमार्गे तस्करीने आणली जाते. त्यानंतर ती ट्रक व रेल्वेद्वारा नागपुरात पोहोचते. पण, करोनाकाळात आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यात आल्या.

भारतात करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा झपाटय़ाने वाढत असल्यामुळे म्यानमार व इंडोनेशियात भारतीयांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे व्यापारही बंद आहे. या परिस्थितीतही शहरात इंडोनेशियाची सडकी सुपारीची तस्करी सुरू

आहे. गेल्या काही वर्षांपासून उपराजधानीतील सुपारीची बाजारपेठ ‘मामा’ नावाच्या व्यक्तीभोवती केंद्रित झाली आहे. एका मुंबईस्थित तस्कराचा मामाच्या पाठीवर हात असून आज आंतरराष्ट्रीय सीमा बंद असताना तो इंडोनेशियातून सुपारी आणत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. केंद्रीय गुप्तचर महसूल संचालनालय, कस्टम आणि सक्तवसुली संचालनालयाने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

१८ ट्रकची खेप रस्त्यावर!

मामाने नुकतीच सिलचर येथील तस्कराशी संवाद साधून १८ ट्रक सुपारीची खेप मागवली आहे. त्यापैकी जवळपास सात ट्रक रस्त्यावर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मामा सध्या हे ट्रक नागपुरात न बोलवता महाराष्ट्राच्या सीमेवरील छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील गावांमध्ये काही गोदाम भाडय़ाने घेतले आहेत. त्या गोदामांमध्ये ट्रक रिकामे करून तेथून महिंद्रा पिक व इतर छोटय़ा ट्रकने सुपारी नागपुरात आणली जात आहे. पण, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.