कामठीमार्गावर अवैध व्यवसाय; भविष्यात टोळीयुद्धाचा भडका शक्य

विद्युत प्रकल्पांमध्ये कायमच निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा होत असल्याची ओरड केली जाते. मात्र, या समस्येच्या मूळापर्यंत कोणीही पोहोचू इच्छित नाही. त्याला कारणीभूत आहे तो कोळशाचा काळा धंदा. हा काळा धंदा कामठी मार्गावर अनेक वर्षांपासून सर्रास सुरू असून त्यातून भविष्यात टोळीयुद्ध पेटण्याची शक्यता आहे.

विदर्भात अनेक ठिकाणी कोळसा खाणी आहेत. त्यामुळे औष्णिक विद्युत प्रकल्पही विदर्भातच सर्वाधिक आहे. खाणींमधून कोळसा काढण्याचे काम वेकोलीमार्फत केले जाते.वॉशरीत स्वच्छ केल्यानंतर तो औष्णिक विद्युत प्रकल्प, खासगी उर्जा निर्मिती प्रकल्प आणि छोटय़ा मोठय़ा लघु उद्योजकांना पुरवण्यात येतो. विद्युत प्रकल्पांना पुरवण्यात येणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याची कायमचीच ओरड असते. त्यामुळे आता राज्यात विदेशातील कोळशाची आयात करण्यात येते.

दरम्यान विद्युत प्रकल्पांना निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठय़ामागे कोळसा चोरी हे प्रमुख कारण आहे. चोरांवर राजकीय पुढारी व पोलिसांचा नेहमीच वरदहस्त राहतो. नागपूरजवळील कामठी शहर हे कोळसा चोरीचे प्रमुख केंद्र आहे. या भागात सध्या सोनू हाटे नावाच्या इसमाच्या कारवाया जोरात सुरू असल्याची माहिती आहे. त्याला कुख्यात कालू हाटे व शरद हाटे यांचे अशीर्वाद असून हाटे हे  या भागातील राजकीय नेते रणजित सफेलकर याच्या गटाचे आहेत. त्यामुळेही तेथील कोळसा चोरांवर कारवाई होत नाही. मात्र, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि परिमंडळ-५ चे उपायुक्त सुहास बावचे हे कोळसा चोरांना वेसण घालतील का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

व्यवसाय असा चालतो

  • परिसरातील विविध कोळसा खाणींमधून निघणारा कोळसा हा विद्युत प्रकल्पांना मालमोटारींद्वारे पाठवला जातो. दिवसरात्र वाहतूक सुरू असते. सोनू हाटे हा ट्रकचालकांच्या संगनमताने रात्री विद्युत केंद्रात कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून २० ते २५ किलो कोळसा एका ट्रकमधून काढतात. तो त्याच्या कोल डेपोत जमा करतो. एका रात्री जवळपास २ ते ३ ट्र2क कोळसा जमा होत असल्याची माहिती आहे. त्याची बाजारात किंमत बाजारात २५ ते ३० हजार रुपये आहे. ट्रकमधील काढलेला कोळशाचे बिंग फुटू नये म्हणून ट्रकचालक हे ट्रकमधील शिल्लक कोळशावर पाणी शिंपतात. या काळया धंद्यात स्थानिक पोलिसांचेही हात काळे असल्याने चोरांवर कारवाई होत नसल्याची माहिती आहे.

कोळसा चोरीचा प्रकार गंभीर असून तो खपवून घेतला जाणार नाही. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

ललित वर्टीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक