नागपूर महापालिकेच्या  परिसर पालकत्त्व योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र सहकारनगरातील मैदानाच्या बाबतीत निर्माण झाले आहे. दरम्यान, लक्ष्मीनगर झोन आयुक्तांनी संबंधित संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

महानगरपालिकेने परिसर पालकत्त्व योजना जाहीर केल्यानंतर लक्ष्मीनगर झोन क्र. एक अंतर्गत सहकारनगर येथील मैदानाचे पालकत्त्व संजय जोशी व त्यांचा मुलगा वेदांत जोशी यांच्या ‘सहकारनगर व्हॉलिबॉल, बॅडमिंटन अ‍ॅण्ड  फिजिकल फिटनेस क्लब’या संस्थेला देण्यात आले होते. एक चांगला उपक्रम म्हणून सहकारनगरातील नागरिकांनी त्यावेळी संस्था स्थापण्यासाठी जोशी यांना सहकार्य केले. मात्र, त्यांनी या नागरिकांना डावलून स्वमर्जीने कारभार सुरू केल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

परिसर पालकत्त्व योजना ही केवळ त्या परिसराचे रक्षण, स्वच्छता याकरिता राबवली जाते. याठिकाणी जोशी यांनी संस्थेचे नाव आणि स्वत:चे व मुलाच्या नावाने फलक लावला. अधिकृत क्रीडा प्रशिक्षण घेतलेले नसताना सुद्धा सोनेगावातील मुलांना बोलावून क्रीडा प्रकार राबवण्यास सुरुवात केली. सहकारनगरातील मुले तसेच मुलींना याठिकाणी खेळण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांनी  विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्या मुलांच्याच विरोधात तक्रारीचा प्रकार जोशी यांनी केला. महानगरपालिकेच्या अखत्यारितील या मैदानावर खासगी हक्क दाखवण्यास आणि व्यावसायिक           उपक्रम राबवण्यास त्यांनी सुरुवात केली. नगरसेवक लहुकूमार बेहते यांनीही जोशी यांचीच बाजू घेतली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी २६ फेब्रुवारीला या या बाबत महापालिका आयुक्त, लक्ष्मीनगर झोन आयुक्त तसेच सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीनंतर महापालिका तसेच झोन आयुक्त व सोनेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस याठिकाणी पाहणीसाठी आले. नागरिकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर लक्ष्मीनगर झोनच्या सहाय्यक आयुक्तांनी परिसर पालकत्त्व योजनेच्या अर्टी व शर्तीचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवला. तसेच या मैदानाचे पालकत्त्व का रद्द करण्यात येऊ नये, अशी नोटीस ५ मार्चला जोशी यांना बजावली. मात्र, मुदतीला अवघे दोन दिवस उरले असताना अजूनपर्यंत त्याचे उत्तर देण्यात आलेले नाही.

संस्थेला कारणे दाखवा नोटीस

परिसर पालकत्त्व योजनेत फक्त देखभाल करावी  लागते. त्यांचा मालकी हक्क, अधिकार नसतो. या योजनेकरिता असाच एक अर्ज आला होता आणि त्याला परवानगी देण्यात आली. मात्र, सहकारनगर परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पाहणी केली असता, त्या तक्रारीत बऱ्याच अंशी तथ्य आढळून आले. त्यामुळे संजय जोशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.  – सुवर्णा दखणे, सहा. आयुक्त, लक्ष्मीनगर झोन

तक्रार खोटी

नागरिकांची तक्रार पूर्णपणे खोटी आहे. नागरिकांनीच या उपक्रमाला सहकार्य केले. अस्तित्त्वाच्या लढाईसाठी हा प्रकार सुरू आहे. संजय जोशी समाजसेवा करत आहे. त्याठिकाणी व्यावसायिक उपक्रम राबवला जात नाही.    – लहुकूमार बेहते, नगरसेवक

‘‘लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्यांना संबंधित जागेची पाहणी करण्यास सांगितले आहे. तेथे कोही बेकायदेशीर असेल तर त्यावर तत्काळ कारवाई करा, असे आदेश दिले आहे.’’   – अश्विीन मुदगल,  आयुक्त महापालिका