News Flash

राजभवनच्या पाठीमागे विनापरवानगी खोदकाम

सध्या शहरात सिमेंट रस्ते तयार करणे, मेट्रोचे काम आणि महापालिकेची विविध कामे सुरू आहेत.

वाहतुकीला अडथळा; महापालिका आयुक्तांकडे पोलिसांची तक्रार

शहरात विकास कामांचा धडाका सुरू आहे. मात्र, हे करताना नियम धाब्यावर बसवून काम करण्यात येत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. राजभवनच्या पाठीमागच्या प्रवेशद्वारासमोर सेमिनरी हिल्स चौकात अगदी मधोमध रस्त्याचे खोदकाम करण्यात येत असून त्यासंदर्भात वाहतूक पोलीस विभागाकडे चौकशी केली असता संबंधिताने विनापरवानगी खोदकाम सुरू केले असल्याची बाब समोर आली आहे.

सध्या शहरात सिमेंट रस्ते तयार करणे, मेट्रोचे काम आणि महापालिकेची विविध कामे सुरू आहेत. शहरातील प्रत्येक रस्त्यावर खोदकाम सुरू असल्यामुळे रस्त्यांवर खड्डे आहेत.

काही दिवसांपूर्वी गांधीबाग परिसरात महापालिकेद्वारा सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या विहिरीत पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. यापूर्वी जवळपास तीन वर्षांपूर्वी विद्यापीठ ग्रंथालय चौकात रिलायन्स कंपनीचे केबल टाकण्यासाठी खोदण्यात करण्यात आलेल्या खड्डय़ात एका चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला.

याशिवाय अशा खड्डय़ांमुळे असंख्य अपघात झालेले असून रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून त्यासंदर्भात महापालिका प्रशासनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी सहयोग ट्रस्टच्या वतीने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या सर्व घडामोडीनंतरही महापालिका प्रशासनाला जाग येत नाही.

काही दिवसांपूर्वी ओसीडब्ल्यूने छावणी चौकात अशाचप्रकारे विनापरवानगी खड्डा खोदला होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक पोलिसांच्या तक्रारीवर ओसीडब्ल्यूविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर आता पुन्हा राजभवनाच्या पाठीमागच्या प्रवेशद्वारासमोरच रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची पूर्व परवानगी घेण्यात आली नाही. या ठिकाणी कुणाचा अपघात झाल्यास, जबाबदारी कुणाची असेल? असा सवाल करण्यात येत आहे.

पूर्वपरवानगी घेणे आवश्यक

राजभवनच्या पाठीमागील रस्त्यावर खोदकाम करण्यात येत असल्याची माहिती नुकतीच मिळाली. यासंदर्भात कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्या खोदकामासाठी पोलीस विभागाची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही. शिवाय त्या ठिकाणी नियमानुसार बॅरिकेटिंग करण्यात आली नाही. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा केली असून तेथे एक शिपाई तैनात करण्यात आला आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार असलेल्या रस्त्यांवर खोदकाम करताना कंत्राटदारांनी वाहतूक विभागाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

– स्मार्तना पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त

कायदेशीर कारवाई करू

राजभवनच्या पाठीमागील प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर खोदकाम करण्यात येत असल्याची माहिती आपल्याला मिळाली. त्यासंदर्भात महापालिकेच्या वाहतूक विभागाला कळविण्यात आले आहे. जर कंत्राटदाराने आवश्यक परवानगी घेतली नसेल, तर त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. कंत्राटदारांनी नियमांचे पालन करावे.

– श्रावण हर्डिकर,महापालिका आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 5:15 am

Web Title: illegal digging work behind raj bhavan
Next Stories
1 नव्या वर्षांत मेट्रोचे काम महत्त्वाच्या टप्प्यात!
2 राजपथावरील पथसंचलनात  उपराजधानीतील बालगोपालांचे पाय थिरकणार
3 ‘स्मार्ट सिटी’त पर्यावरणाची परवडच!
Just Now!
X