मुंबईतील घटनेनंतर अग्निशमन दलाला जाग; हॉटेल्स, पब, बारमध्ये आपत्कालीन मार्ग, सुरक्षेच्या सुविधांचा अभाव

मुंबईतील एका रेस्टॉरेंटला लागलेल्या आगीत १४ जणांना प्राण गमवावले लागले. त्या घटनेनंतर नागपुरातील हॉटेल्स, पब, बिअर बार आणि कॅफेच्या नावावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्येही अग्निशमन नियमांचे उल्लंघन होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मुंबईतील घटनेनंतर नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला जाग आली असून अशा प्रतिष्ठानांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील लोअर परळ भागातील कमला मिल कंपाऊंडमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेले ‘१ अबव्ह’ या टेरेसवरील रेस्टॉरेंटला आग लागली. त्यावेळी रेस्टॉरेंटमध्ये ‘फायर शो’ सुरू होता. छतावर बांबू व प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग झपाटय़ाने पसरली व बाजूला असलेल्या ‘मोजोस ब्रिस्ट्रो’ पबमध्ये पोहोचली. त्यावेळी पबमध्ये असलेल्या लोकांचा श्वास गुदमरायला लागला आणि १४ जणांचा मृत्यू झाला, तर १२ वर लोक गंभीर जखमी आहेत. अशाप्रकारची घटना नागपुरातही घडू शकते. नागपुरात अशाप्रकारे अनेक रेस्टॉरेंटच्या छतावर अनधिकृत रेस्टॉरेंट व बार सुरू आहेत.

त्याशिवाय शहरातील अनेक हॉटेल्स, पब, बार व हुक्का पार्लरमध्ये ‘व्हेंटीलेशन’ची सुविधा नसते, आपत्कालीन मार्ग नसल्याची बाब समोर आली आहे. हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंट छतावर रेस्टॉरेंट असून त्यावर प्लास्टिक व बांबूचे छत आहे. त्याशिवाय रामदासपेठ येथील सेंटर पॉईंट, हॉटेल प्राईड सदरमधील हेरिटेज हॉटेल्स, शंकरनगर परिसरातील क्लाऊड सेवन, अभ्यंकरनगर येथील एस. आर. कॅफे (हुक्का पार्लर) वर ‘रुफटॉप’ आहे. त्याशिवाय शहरभर सुरू असलेल्या बऱ्याच सावजी हॉटेल्सचे छत प्लास्टिकचे आहेत. अशा ठिकाणी एक ठिणगीही पडली तर लवकर आग झपाटय़ाने परसण्याची शक्यता आहे.

या सुविधा असायला हव्यात

तळमजल्यावर प्रतिष्ठान असल्यास त्या ठिकाणी आग विझवण्याचे बंब असावेत. मात्र, बहुमजली इमारत असल्यास त्या ठिकाणी फायर डिटेक्टर, स्प्लींकर, फायर अलार्म, वॉटर बेस्ड फायर कन्ट्रोल आणि अग्निशामक बंब असणे आवश्यक आहे. जुन्या इमारतींमध्ये ते शक्य नाही. मात्र, नवीन इमारतींना अग्निशमन नियम बंधनकारक आहे. मात्र, अनेक बांधकाम व्यावसायिक अग्निशमन विभागाच्या निरीक्षणावेळी साहित्य उपलब्ध करून ठेवतात व ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यानंतर सर्व साहित्य बाजूला करतात. नागरिकांनी इमारत खरेदी करताना या बाबी तपासून घेणेही आवश्यक आहे, असेही उचके म्हणाले.

या पबची तपासणी करा

शहरात सदर येथे लोकल, झिंक, तुली इंटरनॅशनमध्ये आरएनबी, सिव्हिल लाईन्स येथील पाबलो, एम्प्रेस मॉलमधील हाईडआऊट, धरमपेठ येथील फिओना, सीताबर्डीतील टीडीएस आणि शहरातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये पब चालतो. पंचतारांकित हॉटेल्स वगळता इतर पबमध्ये कुठेही व्हेंटीलेशन किंवा आपत्कालीन मार्गाची सुविधा असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अग्निशमन विभाग त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे बघावे लागेल.

हुक्का पार्लरला आगीचा धोका

अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत वाईब, गुडगुड, कोपा, कर्बस्टोन, स्पॉट ९, नवाब, विला ६५, स्पीडस, सदर पोलीस ठाण्यांतर्गत हॉब फार्मिशन, एमआर, चिल अ‍ॅण्ड ग्रिल, कार्नेशन, बजाजनगरमध्ये एसआर, पाचपावलीमध्ये फिरंगी, राणाप्रतापनगरमध्ये वेअरहाऊस हे हुक्का पार्लर सुरू आहेत. त्याशिवाय सीताबर्डी, एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गतही हुक्का पार्लर सुरू आहेत. हुक्का पिण्याकरिता ‘कॉईल’ जाळावी लागते. त्यासाठी पार्लरमध्ये व्यवस्था असते. शिवाय अंधूक प्रकाश असतो आपत्कालीन मार्ग व अग्निशमन सुविधा या केवळ कागदावरच असतात. त्या ठिकाणी आग लागल्यास मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इंटेरियर डेकोरेशनचा सर्वाधिक धोका

घरांमध्ये अनेक ज्वलनशील पदार्थ असतात. त्यामुळे ठिणगी पडल्यास आग भडकण्याची शक्यता असते. सध्या घर व प्रतिष्ठानांमध्ये मोठय़ा प्रमाणात इंटेरियर डेकोरेशन करण्यात येते. त्यावेळी इंटेरियर डेकोरेटर्स प्रामुख्याने प्लायवूड, फोम, कापड, पडदे, बांबू आदींचा वापर करतात. या वस्तू ज्वलनशील असतात. त्यामुळे आग भडकण्याची शक्यता अधिक असते. आग लागल्यानंतर लिफ्टचा वापर टाळावा व उंच इमारत असल्यास इमारतीच्या न जाता पायऱ्यांनी खाली येण्याचा प्रयत्न करावा. आगीमुळे निर्माण झालेला धूर हा वर जात  असतो. त्यामुळे वरच्या मजल्यावरील लोक आगीमुळे नाही, तर गुदमरून मरण्याचा धोका अधिक संभवतो. सार्वजनिक ठिकाणी पडद्यांनी चहुबाजू बंद करण्याची पद्धत प्रचलित असून ते धोकादायक आहे, अशी माहिती राजेंद्र उचके यांनी दिली.

मोजोस्चे नागपूर कनेक्शन

मुंबईतील ‘मोजोस् बिस्ट्रो’ यामध्ये नागपुरातील हॉटेल व्यावसायिक युग तुली, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक के.के. पाठक यांचा मुलगा युग पाठक, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचा मुलगा सिद्धार्थ महादेवन आणि नागपुरातील भाजप आमदाराच्या भावाची भागीदारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचाच ‘मोझोस कॅफे’ नागपुरातील बजाजनगर परिसरात सुरू करण्यात आला होता. मात्र, तत्कालीन पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे यांनी कारवाई केली होती. त्याठिकाणी हुक्का पार्लर आणि दारू विक्री करण्यात येत होती. त्यानंतर नागरिकांच्या तक्रारीवर ते बंद करण्यात आले. त्यात युग तुली, युग पाठक आशीष खेमका आणि ऋषी टेपरीवाल यांची भागीदारी होती. टेपरीवाल हा वर्धा येथील राजकीय घराण्याचा जवळचा नातेवाईक आहे.

एअरपोर्ट सेंटर पॉईंट, प्राईडला नोटीस

मुंबईतील घटनेनंतर अग्निशमन विभागातर्फे शहरातील सर्व हॉटेल्स, पब, रेस्टॉरेंट, बार, लाऊंज आदी प्रतिष्ठानांची पाहणी करण्यात येत आहे. तेथे अग्निशमन नियमांचे पालन करण्यात आले का, हे तपासण्यात येत आहे. ‘फायर शो’ किंवा ‘लाईव्ह किचन’चे चलन अद्याप शहरात नाही. हॉटेल्समधील ‘रुफटॉप’ काढण्यासाठी एअरपोर्ट सेंटर पॉईंट, प्राईड, हेरिटेज यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका