‘एन.ए.’ होण्यापूर्वीच जमिनीवर लेआऊट आराखडा मंजूर; जमीन मालकाची बनावट स्वाक्षरी करून फसवणूक
मुंबईतील ‘कॅम्पा कोला’ प्रकरण देशभर गाजत आहे. या पाश्र्वभूमीवर न्यायालयानेही अवैध इमारत बांधकामांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले असताना जमीन-विक्रीचे अवैध व्यवहार सुरू असल्याची धक्कादायक बाब ‘पायोनिअर समूहाच्या’ जयताळा येथील प्रकल्पावरून समोर आली आहे. पायोनिअर समूहाने जयताळा येथे निर्माण केलेली ‘पायोनिअर डॅफोडिल्स’ ही उच्चभ्रू निवासी वसाहत नागपुरातील ‘कॅम्पा कोला’ ठरू पाहात आहे.
शंकरनगर निवासी दत्तात्रय पितळे यांची जयताळा येथे वडिलापार्जित दोन एकर शेती होती. ही शेती विकण्याचा निर्णय त्यांनी २०११ मध्ये घेतला. १७ नोव्हेंबर २०११ च्या करारानुसार दत्तात्रय पितळे यांनी ८१०० चौरस मीटर जागा ४ कोटी २३ लाखांमध्ये ‘पायोनिअर’ला विकली. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते- पाटील यांची पत्नी सीमा सुबोध मोहिते- पाटील यांच्या मालकीची ही कंपनी आहे. वरील रक्कम दत्तात्रय पितळे यांना टप्प्याटप्प्यांत मिळणार होती.
तत्पूर्वी कंपनीच्या संचालकांनी विक्रीपत्र न करताच आणि पितळे यांना अंधारात ठेवून त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून भूखंड अकृषक (एन.ए.) करण्याचा प्रस्ताव अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. हा प्रस्ताव अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी ११ एप्रिलला २०१२ ला फेटाळला. हा प्रस्ताव फेटाळत असल्याची एक प्रत चुकीने पितळे यांना टपालाद्वारे मिळाली आणि सर्व प्रकार उघडकीस आला. त्यामुळे त्यांनी कंपनीला जाब विचारला.
राजकीय बळाचा वापर करून जमिनीला अकृषक प्रमाणपत्र मिळाले नसतानाही ८ मे २०१२ ला महापालिकेने लेआऊट आराखडय़ाला तत्वत: आणि अंतिम मंजुरी प्रदान केली. त्यानंतर २४ मे २०१५ ला जमिनीला अकृषक दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे अकृषक दर्जा प्राप्त होण्यापूर्वीच महापालिकेने कोणत्या आधारे लेआऊट आराखडय़ाला मंजुरी प्रदान केली हा प्रश्न उपस्थित होतो. त्यानंतर २० जून २०१२ ला सशर्त विक्रीपत्र करण्यात आले. विक्रीपत्रानंतर २९ ऑगस्ट २०१२ ला इमारत आराखडा मंजूर झाला. या ठिकाणी दोन आणि तीन बीएचके सदनिका निर्माण करण्यात आल्या आहेत. या बहुमजली इमारतींमध्ये शेकडो कुटुंबे राहात असून, या इमारतींचा ‘कॅम्पा कोला’ तर होणार नाही ना? याची भीती तेथील रहिवाशांमध्ये आहे.
प्रकरण न्यायप्रविष्ठ
पायोनिअर कंपनीत आपण संचालक नाही. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणतेही वक्तव्य करणे चुकीचे ठरेल. न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल, असे सुबोध मोहिते पाटील यांनी सांगितले.

जमीन मालक दत्तात्रय पितळे यांनी स्वत:च्या कुटुंबासाठी ८१०० चौरस मीटर जागेच्या शेजारीच ४८७ चौरस मीटर जागा वाचवून ठेवली होती. परंतु पायोनिअर समूहाने लेआऊट आराखडा आणि इमारत आराखडा सादर करताना शेजारच्या ४८७ चौरस मीटर जागेचा ‘एफएसआय’ (चटई क्षेत्र) वापरून अनधिकृतपणे सदनिका बांधल्या. त्यामुळे पायोनिअर समूहाच्या संचालकांविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत. पायोनिअर समूहाने आपल्या बनावट स्वाक्षऱ्या करून फसवणूक केली आहे. सर्व व्यवहारात कंपनीने आपली बनावट स्वाक्षरी केली. जमिनीवरील सर्व बांधकाम अवैध असून, त्याला बेकायदेशीर मंजुरी प्रदान करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करून बांधकाम पाडण्यात यावे, यासाठी लढा सुरू आहे.
– दत्तात्रय पितळे, मूळ जमीन मालक