तो पोलीस शिपाई होण्याचे स्वप्न उराशी बाळगून भरती प्रक्रियेत सहभागी झाला. पण, त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मन निराश झाले. उदरनिर्वाहाचा प्रश्न आणखी गंभीर झाला. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्याने भन्नाट युक्ती लढवली. तो तडक बाजारात गेला, पोलिसांचा गणवेश मिळवला. बनावट ओळखपत्र तयार करून घेतले. वाहतूक नियमांचा सखोल अभ्यास केला आणि पोलिसांचा गणवेश घालून रोज रस्त्यावर वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून अवैध वसुली करू लागला. गेल्या पाच वर्षांपासून त्याचा हा गोरखधंदा बिनबोभाट सुरू होता, परंतु त्याचे बिंग अखेर फुटले आणि तो गजाआड गेला.

दिलीप टापरे (३२) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्य़ातील भिसी येथील रहिवासी असून रमना मारोती परिसरात भाडय़ाने राहतो. शिक्षणासाठी तो सात वर्षांपूर्वी शहरात आला. त्याने पदवीपर्यंत शिक्षण घेतले. सहा वर्षांपूर्वी त्याने शहर पोलीस शारीरिक चाचणी व परीक्षा दिली होती. पण, त्याच्या पदरी अपयश पडले. या अपयशानंतर त्याने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाजारातून खाकी गणवेश खरेदी केला. त्यानंतर पोलीस असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून गणवेश घालून तो रस्त्यावर फिरू लागला.

दररोज सकाळी घरातून निघाल्यानंतर तो लकडगंज, नंदनवन, कळमना अशा परिसरातील रस्त्यांवर उभा राहून वाहनचालकांना अडवू लागला. वाहतूक नियमांचा अभ्यास करून तो लोकांना वाहतूक नियम मोडण्यासाठी चालान भरावे लागेल म्हणून धमकावू लागला. त्यांच्याशी तडजोड करून मिळेल ते पैसे खिशात ठेवू लागला. गेल्या पाच वर्षांपासून हा गोरखधंदा करीत होता. अशा माध्यमातून त्याने लाखो रुपयांची माया जमवली असावी, असा संशय पोलिसांना आहे. काही दिवसांपूर्वी लकडगंज पोलिसांकडे व्यापाऱ्यांनी एका पोलीस शिपायाची तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक राम बांदेकर यांनी चौकशी केली असता त्यांच्या ठाण्यातील कोणताच कर्मचारी असे करीत नसल्याचे निष्पन्न झाले. हा पोलीस शिपाई रस्त्यावर एकटाच उभा राहून वाहनांवर कारवाई करीत असल्याचे समजल्यावर बांदेकर यांना संशय आला. कर्मचाऱ्यांसह त्यांनी त्याला ताब्यात घेतले व चौकशी केली असता तो बनावट पोलीस असल्याचे निष्पन्न झाले.

वाहतूक पोलिसांसमोरच सावज हेरायचा

दिलीप गंगाजमुना परिसरातील बालाजी मंदिरजवळ नेहमी उभा राहायचा. गंगा जमुना चौकातील वाहतूक पोलिसांना तो दिसायचा. पण, तो खरा पोलीस कर्मचारी असावा व लकडगंज पोलीस ठाण्यात कार्यरत असावा, असा समज वाहतूक पोलिसांचा होता. त्यामुळे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. अनेकदा त्याने वाहतूक पोलिसांच्या समोरच वाहन अडवून त्यांना तडजोडीसाठी दुसरीकडे घेऊन जाताना वाहतूक पोलिसांनी बघितले होते. पण, तो अतिशय आत्मविश्वासाने अवैध काम करीत असल्याने वाहतूक पोलिसांना त्याचा कधीच संशय आला नाही.

पत्नी, आईवडीलही अंधारात

शिक्षणानिमित्त नागपुरात आल्यानंतर आपण पोलीस दलात भरती झाल्याचे दिलीपने आईवडिलांना सांगितले. विवाहासाठी मुलगी शोधताना त्याने पोलीस असल्याचीच बतावणी केली. त्याच आधारावर विवाह केला. विवाह झाल्यानंतर तो पत्नीला घेऊन नागपुरात आला व दररोज सकाळी वर्दी घालून तो घराबाहेर पडायचा. त्याला चार वर्षांची मुलगी आहे. आजवर त्याने पत्नीला पोलीस असल्याचेच सांगितले. शेवटी त्याचे पितळ आज उघड पडले.