केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत नागपूर शहराला विकसित करण्यात येणार आहे, परंतु लोकवस्ती वाढत असताना त्याची गरज लक्षात घेऊन बाजारपेठा उपलब्ध होत नसल्याने बाजार रस्त्यावर भरविले जात आहेत. यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. चौकात आणि भर रस्त्यावरील या आठवडी बाजारांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांना देखील मार्ग काढणे जिकरीचे होते. यामुळे परिरातील नागरिकांना होणारी गैरसोय, सडलेल्या भाजीपाल्यांमुळे होणारी दरुगधी आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये चौकात किंवा मुख्य रस्त्यांवर भाजीपाला आणि फळ विक्री होत आहे. नागपूर शहर चारही बाजूने वाढत आहे. ‘रिंग रोड’च्या पलीकडे दोन ते तीन किमी अंतरापर्यंत लोकवस्ती झालेली आहे. वस्ती वाढली की तेथील नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी बाजापेठ हवी असते. दररोज भाजी घेणे किंवा दारावर आलेल्या विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करण्याचे प्रमाण वाढले असले तरी आठवडी बाजाराची संकल्पना अजूनही कायम आहे, परंतु वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन विशिष्ट अंतरावर बाजारासाठी मोकळी जागा नसल्याने रस्त्यावर किंवा चौकात हे आठवडी बाजार भरू लागले आहेत. स्मार्ट सिटी संकल्पना आणि रस्त्यावरील बाजार हे विरोधाभासी चित्र शहराचे आहे. त्यावर प्रकाश टाकणारी ही वृत्तमालिका.

पूर्व नागपुरातील हसनबाग चौकात दर सोमवारी आठवडी बाजार मांडला जात असल्याने दुपारी दोन तीन वाजपासून रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक ठप्प करण्यात येते. रस्त्यावर भरणाऱ्या या बाजारामुळे रुग्णवाहिका, स्कूल बसला अडचण होत असून सडलेल्या भाजीपाला, मासोळ्यामुळे परिसरातील नागरिकांना दरुगधीचा त्रास होत आहे.

हसनबाग चौकातील आठवडी बाजार गुरदेवनगर ते ईश्वरनगर चौक ते हसनबाग चौक आणि हसनबाग चौक ते हसनबाग पोलीस चौक तसेच आता डायमंडनगपर्यंत बाजार वाढत चालला आहे.

उमरेड मार्गावरील शीतलामाता मंदिर चौकाकडून हिवरीनगरकडे किंवा खरबी चौकाकडे जाणाऱ्या वाहतुकीला या बाजाराचा अडथळा होतो. हिवरीनगगर, विद्यानगर, नंदनवन भागात अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. या चौकात वाहतूक कोंडी होत असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो. सोमवारी सायंकाळी या मार्गावरून स्कूल बस चालू शकत नाही, अशी परिस्थिती असते. पूर्व आणि दक्षिण नागपूरला जोडणारा हा महत्त्वाचा चौक आहे. तसेच भंडाऱ्याकडून वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय व महाविद्यालय तसेच सक्करदऱ्यातील खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना या चौकातून ये-जा करावी लागते, परंतु या बाजाराचा मोठा अडथळा रुग्णवाहिकांना होत आहे.

रस्त्यावरील हा बाजार अनधिकृत आहे. महापालिकेला त्यापासून उत्पन्न नाही. रस्त्यांवर दुकाने थाटणारे सडलेला भाजीपाला, मासोळ्या, मांसाचे तुकडे रस्त्यावर किंवा बाजूच्या कोपऱ्यात टाकून मोकळे होतात. घाण पाणी देखील रस्त्यावर टाकतात. त्यामुळे परिसरात दरुगधी पसरते, असे ईश्वरनगरातील श्रुती विंचूरकर म्हणाल्या.

जागा उपलब्ध करावी

आठवडी बाजार लोकांची गरज आहे. रस्त्यावर भरणाऱ्या बाजारांना जागा उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी त्यांच्यावर शुल्क आकारले पाहिजे. त्यामुळे लोकांची सोय होईल. तसेच महापालिकेला आठवडी बाजार तसेच गुजरीमधून कोटय़वधी रुपयांचे उत्पन होईल. याशिवाय शहरातील चौक आणि कोपरा बघून अनेक पाणीपुरी, खाद्यपदार्थ, फळ विक्रेते तसेच फेरीवाले उभे असतात. त्याची नोंद घेऊन त्यांच्याकडून शुल्क वसूल करायला हवे, परंतु महापालिकेकडे त्याचे नियोजन नसल्याचे दिसून येते.

– तानाजी वनवे, विरोधी पक्षनेता, महापालिका.