News Flash

बाळ उशिरा बोलेल असा समज बाळाच्या भविष्यासाठी धोक्याचा

काही मुलांमध्ये जन्मजात कर्णबधिरता असते व त्यातला मुकेपणा हा बहिरेपणाचाच परिणाम असतो

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. आशीष दिसावाल, डॉ. दिनेश अग्रवाल यांची माहिती; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

जन्मानंतर बाळ वेळीच बोलत नसेल आणि अशा स्थितीत बाळ उशिरा बोलेल, असा समज जर कुणी पाळत असेल तर तो बाळाच्या भविष्यासाठी धोक्याचा आहे. मुलांच्या कर्णदोषाचे निदान व उपचारातून त्याचे अपंगत्व टाळता येते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले तर कायमचे मूक-बधिरपणही येऊ शकते, अशी माहिती  इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विद्यार्थी नेटवर्क विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कान-नाक- घसा रोग तज्ज्ञ डॉ. आशीष दिसावाल आणि आयएमए नागपूरचे सचिव डॉ. दिनेश अग्रवाल यांनी दिली. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

डॉक्टर म्हणाले,  काही मुलांमध्ये जन्मजात कर्णबधिरता असते व त्यातला मुकेपणा हा बहिरेपणाचाच परिणाम असतो. हा आजार वेळीच ओळखून उपचार व प्रशिक्षण देता येते. मूल ऐकून-ऐकून बोलायला शिकतात. म्हणून त्याच्याशी सतत बोलत राहिले पाहिजे. काही मुलांना जन्मजात बधिरता असते. हे आई-वडिलांच्या लक्षात यायला उशीर होतो. यावर खूप औषधोपचार नाही, मात्र हा दोष लवकर ओळखून त्यादृष्टीने संगोपन व प्रशिक्षण देता येते. बधिरतेमुळे शब्द कळत नाहीत, म्हणून ही मुले मूक राहतात. सरकारने निनोनॅटल स्क्रिनिंग प्रोग्राम अंतर्गत जन्मणाऱ्या मुलांची चाचणी करण्याचे ठरवले आहे.

या ओएचई चाचणीतून जन्मजात बहिरेपणा किंवा कमी-जास्त बहिरेपणा ओळखता येऊ  शकतो. या चाचणीनुसार काही प्रमाणापर्यंत बहिरेपणा असेल तर मशीनद्वारे त्यावर मात करता येते. पूर्ण बहिरेपणा असेल, तर त्यासाठी लागणाऱ्या ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ या क्लिष्ट व खर्चिक प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची तयारी लवकर व योग्य वयात करता येते. परिणामी, जन्मजात पूर्ण बहिरेपणावरही पूर्णपणे मात करता येते. त्यामुळे पालकांनी जन्मलेल्या बालकाची ही चाचणी करून घेणे गरजेचे आहे. मुलगा विलंबाने बोलेल या समजातून चार ते पाच वर्षांहून जास्तचा विलंब झाल्यास मेंदूच्या विशिष्ट भागावर वाईट परिणाम होऊन ही मुले भविष्यात कायमची मूक-बधिर होऊ शकतात, असे डॉ. दिसावाल यांनी सांगितले.

पुनर्वसनासाठी प्रयत्न

समाजाचा कर्ण-बधिर व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट आहे. त्यांना कुणी नोकरीवर ठेवत नाही. त्यामुळे या संवर्गातील व्यक्ती रोजगारासाठी भटकत असतात. शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने या सर्वाना विविध प्रशिक्षण देऊन त्यांना हॉटेलसह इतर औद्योगिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न कान-नाक-घसा रोग तज्ज्ञांसह इतरही क्षेत्रातील मान्यवरांकडून केले जाणार आहेत, अशी माहिती पॅथोलॉजिस्ट डॉ. दिनेश अग्रवाल यांनी दिली.

सर्वाधिक कॉक्लिअर इम्प्लांट केंद्र नागपुरात

मध्य भारतातील सर्वाधिक कॉक्लिअर इम्प्लांट केंद्र असलेले नागपूर हे एकमात्र शहर आहे. नागपूरच्या मेडिकल, मेयो या दोन शासकीय रुग्णालयांसह ऑरेंज सिटी रुग्णालय, वोक्हार्ट, डॉ. कापरे रुग्णालयात असे एकूण पाच केंद्र आहेत. कॉक्लिअर इम्प्लांट ही ५ ते १० लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया असली तरी टाटा ट्रस्टच्या वतीने आर्थिक सहाय्य करून गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना मदत केली जाते. शहरात आजपर्यंत १२५ हून जास्त मुलांना या प्रत्यारोपणाचा लाभ दिल्याचे डॉ. दिसावाल यांनी सांगितले. कॉक्लिअर इम्प्लांटनेतर या मुलांना शासकीय योजनेत असल्यास स्पिच थेरपीसह इतरही बऱ्याच सुविधा नि:शुल्क असल्याचे त्यांनी सांगितले.

वाडीत कावीळ नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न हवे

वाडीत दूषित पाण्यामुळे कावीळचे रुग्ण वाढले असून काही मृत्यूही झाले आहेत. या आजारातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आता किमान काही महिने येथे शुद्ध पाण्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने येथे पुरवठा करणाऱ्या प्रत्येक टँकरचे नमुने प्रयोगशाळेत तपासूनच नागरिकांना पाणी उपलब्ध करायला हवे. नागरिकांनीही आजार टाळण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी पिण्याचे पाणी उकळून पिण्यासह परिसरात स्वच्छता राखणे, बाहेरचे खाणे टाळण्याची गरज आहे, असे मत डॉ. दिनेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:51 am

Web Title: imagine that the baby will speak late for the babys future is danger
Next Stories
1 मेडिकल, मेयोत उष्माघाताच्या रुग्णांची लपवाछपवी!
2 दिल्ली, मुंबई, पुण्याचे विमानभाडे भडकले
3 फिरत्या जिन्याचे नियंत्रण पुस्तक विक्रेत्याच्या हाती
Just Now!
X