•   डॉ. डी.व्ही. जाधव यांच्याकडून सरकारची पाठराखण
  •   शासकीय तंत्रनिकेतनचा २२ वा पदविका प्रदान सोहळा

नागपूर :  नोकरभरती होत नसल्यामुळे सरकारवर चौफेर टीका होत आहे. पण देशात कुठलेही सरकार आले तरी सर्वच पदवीधरांना रोजगार देणे त्यांना शक्य नाही, अशी भूमिका मांडून अमरावतीचे तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी.व्ही. जाधव यांनी एकप्रकारे सरकारची पाठराखणच केली. त्यामुळे अभियंत्यांनी स्वत:चे ‘स्टार्ट अप’ करून रोजगार देणारे बना असा सल्लाही दिला.

शासकीय तंत्रनिकेतनच्या २२ व्या पदविका प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी टाटा कंसल्टन्सी सव्‍‌र्हिसेस नागपूर केंद्राचे प्रमुख अरिवद कुमार, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. राम निबुदे,

प्राचार्य प्रा. दीपक कुळकर्णी उपस्थित होते.  विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उद्योगांवर भर देऊन कल्पनाशक्तीला वाव द्यावा. उद्योगांकरिता सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या माध्यमातून नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांना सरकार भांडवली मदत करते. ५० लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. अशा योजनांच्या माध्यमातून सरकार रोजगाराची निर्मिती करीत असते. त्यामुळे अभियंत्यांनी याचा लाभ घेत ‘स्टार्ट अप’ सुरू करावे. उद्योग उभा करून रोजगार देणारे बनावे असा सल्लाही डॉ. जाधव यांनी दिला. जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला समृद्ध करावे, असे आवाहन अरिवद कुमार यांनी केले. सोहळ्य़ात ७११ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या. संस्थेतील सर्व अभियांत्रिकी शाखांच्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण व रौप्य पदके तसेच शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे प्रायोजित पुरस्कार मान्यवरांनी प्रदान केले. स्थापत्यचा प्रतीक वानखेडे याचा सर्वाधिक सात पुरस्कार व सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य दीपक कुळकर्णी यांनी केले.

प्रशासकीय सेवेत जाणार

वडील प्रदीप वानखेडे हे स्वत: कंत्राटदार असल्यामुळे मलाही आपसूकच सिव्हिल अभियांत्रिकी शिक्षणाची गोडी निर्माण झाली. तिन्ही वर्षे अभ्यास करताना कोणतेही वेळापत्रक तयार केले नाही. फक्त जेवढा अभ्यास करायचा तो मन लावून केला. माझ्या यशाचा समाजासाठी उपयोग व्हावा ही मनस्वी इच्छा आहे. देशाच्या विकासासाठी प्रशासकीय सेवेत जाणार असल्याचे प्रतीक वानखेडे याने सांगितले. सध्या प्रतीक मुंबई येथील महाविद्यालयात अभियांत्रिकी द्वितीय वर्षांला शिकत आहे.

– प्रतीक 

कठोर परिश्रम घेतले

संगणक विज्ञान विषयात प्रथम यायचा निर्धार केला होता. तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्षांला ते जमले नाही. दुसऱ्या सत्रातही कमी गुण मिळाले. मात्र, तिसऱ्या सत्रापासून कठोर परिश्रम घेतले. ध्येय निश्चित केले आणि यश मिळते असे चार पदक विजेत्या मोनिका ढोलवानी हिने सांगितले. – मोनिका

नियमित वर्ग करण्यामुळेच यश  तिन्ही वर्षे नियमित अभ्यास केला. मात्र, यासोबत नियमित वर्गही केले. वर्गामध्ये शिक्षक जे शिकवायचे त्यामुळे अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होत होत्या. यामुळे प्रत्येक परीक्षेत चांगले गुण मिळवता आल्याचे चार पदक मिळवणाऱ्या विदीनी जलतारे हिने सांगितले. विदीनेही प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. – विदीनी