महेश बोकडे

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू होणार कधी, हा प्रश्न कायम आहे. त्यातच शाळा सुरू झाल्यास तेथे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्वच स्कूलबस, स्कूलव्हॅनची योग्यता तपासणीही अशक्य असल्याचे चित्र आहे. नियमानुसार ही तपासणी कोरडय़ा मार्गावरच व्हायला हवी. परंतु पुढे पावसाळा असल्याने  परिवहन खात्याच्या अडचणी वाढणार आहेत.

राज्यात ३९ हजार २५३ अधिकृत स्कूलबस-स्कूलव्हॅन असून त्याहून अनेक पट अधिक अनधिकृत वाहनांतून ही वाहतूक होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी उच्च न्यायालयाने शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच स्कूलबस-व्हॅनची योग्यता तपासणी प्रत्येक वर्षी करण्याचे आदेश परिवहन खात्याला दिले आहेत. यंदा करोनामुळे उन्हाळ्यात बहुतांश ठिकाणी एकाही स्कूलबस, स्कूलव्हॅनची तपासणी झाली नाही. २६ मे रोजी परिवहन खात्याने लाल क्षेत्राबाहेरील आरटीओत योग्यता तपासणीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. या परिपत्रकात लाल क्षेत्रातील आरटीओ कार्यालयांतील तपासणीवर मात्र प्रतिबंध कायम आहेत. दुसरीकडे शासनाने लाल क्षेत्र व त्याबाहेरील आरटीओ कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा घातली आहे. त्यातच टाळेबंदीपासून सर्वच आरटीओतील योग्यता प्रमाणपत्राचे काम रखडले आहे. हा अतिरिक्त भार असतानाच पुढे शाळा सुरू होण्यापूर्वी सर्वच स्कूलबस-स्कूलव्हॅनची योग्यता तपासणी शक्यच नसल्याचे या क्षेत्राचे जाणकार सांगतात. योग्यता तपासणीसाठीच्या नियमानुसार स्कूलबस-व्हॅनमध्ये आरटीओ अधिकाऱ्यांना २६ मुद्दे तपासावे लागतात. त्यामुळे मोठी स्कूलबस असल्यास १८ मिनिटे, मिनी बस असल्यास १६ मिनिटे, व्हॅन असल्यास ५ मिनिटांसह इतरही वाहनांना विशिष्ट तपासणीसाठीचा वेळ परिवहन खात्याने निश्चित करून दिला आहे. सर्व वाहनांची संख्या आणि निश्चित वेळ यांची गोळाबेरीज केल्यास सर्व वाहने तपासणे शक्यच नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.

बसमध्ये संक्रमण टाळण्याच्या प्रशिक्षणाचे काय?

स्कूलबस-स्कूलव्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करायची झाल्यास विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी सामाजिक अंतर, वेळोवेळी निर्जंतुकीकरणासह इतरही अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. परंतु अद्यापही या वाहनांच्या चालकांना त्याबाबत प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.

‘‘करोनामुळे राज्यातील सर्वच स्कूलबस-स्कूलव्हॅनची योग्यता तपासणी करण्यात काही अडचणी येत आहेत. परंतु परिवहन विभाग पूर्ण क्षमतेने सर्व वाहनांच्या योग्यता तपासणीचा प्रयत्न करेल. कोरडय़ा मार्गावरच वाहनांच्या तपासणीचा असा काही नियम नाही. पाऊस नसताना विशेष मार्गावर या तपासण्या करता येतात.’’

– शेखर चन्ने, परिवहन आयुक्त, मुंबई.