देशी-विदेशी प्रजातीच्या कुत्र्यांना असणारी मागणी आणि त्यासाठी मोजावी लागणारी अधिक किंमत यामुळे शहरात आता श्वान चोरीचे प्रमाण वाढीस लागले आहे.

प्रजनन केंद्र सुरू करण्यासाठी लागणारी मोठी प्रक्रिया टाळून आडमार्गाने देशी-विदेशी प्रजातीचे श्वान चोरी केले जातात आणि प्रजनन प्रक्रियेतून जन्माला आलेल्या श्वानांची पिल्ले हजारो रुपयांना विकली जातात. ग्रेट नाग रोड परिसरात सकाळच्या सुमारास असाच एक प्रकार उघडकीस आल्याने श्वानमालकांमध्येही आता भीती पसरली आहे.

शहरात श्वानप्रेमींची संख्या मोठी असून अनेक दुकानांमध्ये दहा हजार रुपयांपासून तर ५० हजार रुपयांपर्यंत श्वानांची विक्री केली जाते.  श्वानांच्या ऑनलाईन विक्रीचा व्यवसाय वाढला आहे. यामुळे अनेकजण अवैध प्रजनन प्रक्रियेचा आधार घेतात.  त्यासाठी दोन ते तीन वर्षांच्या श्वानांची चोरी केली जाते. शहरातही अशी टोळी सक्रिय असून ती अशा श्वानांवर नजर ठेवते. सकाळी अनेकजण श्वानांना फिरायला नेतात. तेव्हा लघुशंकेच्या निमित्ताने त्यांना मोकळे सोडतात. त्याचा फायदा घेऊन ही टोळी श्वानांची चोरी करते. तेलीपुरा निवासी दिलीप आकरे बुधवारी सकाळी त्यांच्या चार वर्षीय मादी श्वानाला फिरण्यासाठी घेऊन जात असताना त्यांना दुचाकीस्वारांनी धक्का दिला आणि श्वानाला घेऊन ते अशोक चौकातून पसार झाले. दोन दुचाकीवर चारजण होते. त्यांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. मात्र, अनेकजण तक्रारी नोंदवत नसल्याने या घटना समोर येत नाहीत.

श्वान चोरीच्या अनेक घटना गेल्या अनेक वर्षांत समोर आल्या आहेत. ‘अ‍ॅनिमल शेल्टर’मध्ये अनेकजण त्यांचे हरवलेले श्वान शोधण्यासाठी येतात. प्रजनन केंद्र सुरू करण्यासाठी प्राणी कल्याण मंडळाची परवानगी तसेच अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. श्वान विक्रीतून मोठय़ा प्रमाणावर पैसा कमावता येऊ शकतो, पण प्रक्रिया मोठी असल्याने अवैध मार्गाचा वापर केला जातो.

– स्वप्निल बोधाने, पशुप्रेमी