24 April 2019

News Flash

दोन दिवसात २० ठिकाणी आगी

शहरातील अनेक भागात आगीच्या घटना घडल्या. त्यातील अनेक आगी कचरा साठवलेल्या ठिकाणी लागल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

अग्निशमन विभागाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

शहरातील विविध भागात ऐन दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे लागलेल्या आगींवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ नियंत्रण मिळवत कोटय़वधींचे होणारे नुकसान टाळले. विशेषत डागा लेआऊट येथील स्केटिंग रिंकजवळ लागलेल्या आगीवर परिसरातील नागरिकांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आणि अग्निशमन विभागाची तत्परता यामुळे मोठी दुर्घटना टळली. गेल्या दोन दिवसात २० ठिकाणी लागलेल्या आगीवर अग्निशमन विभागाने तात्काळ नियंत्रण मिळवल्याने मोठे नुकसान टळले.

शहरातील अनेक भागात आगीच्या घटना घडल्या. त्यातील अनेक आगी कचरा साठवलेल्या ठिकाणी लागल्या आहेत. कुठल्याही घटनेत प्राणहानी झाली नाही. डागा लेआऊट कॉर्पोरेशन कॉलनीतील स्केटिंग मैदानाला लागून प्रशासकीय कार्यालय होते. कालांतराने नागपूर सुधार प्रन्यासने ही जागा एका रेस्टारंटसाठी दिली. रेस्टॉरंट मालकाने त्या ठिकाणी बांबूचे आणि ताटव्यांचे बांधकाम केले. निवासी भागातील या रेस्टॉरंटला परिसरातील नागरिकांना विरोध केला होता. तक्रारीवरून नासुप्रने त्यावर कारवाई केली होती. मात्र, कारवाई केल्यानंतर  त्याच ठिकाणी साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यामुळे तेथील सामानाला आग लागली. परिसरात राहत असलेल्या डागानगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष व पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे आणि काही नागरिकांनी गांभीर्य ओळखून तत्काळ अग्निशमन विभागाला सूचना केली. क्षणाचाही विलंब न लावता अग्निशमन विभागाच्या गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. जरा उशीर झाला असता तर डागानगर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असते, असेही चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले.

धरमपेठ ट्रॅफिक पार्कजवळ एका दुकानात सिलेंडरला आग लागून २५ हजारांचे नुकसान झाले. व्यंकटेश मंदिर देवाडियाजवळ कचऱ्याला आग लागली. लकडगंज अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुभाष नगर रोड केळकर मानव हॉस्पिटल येथील पहिल्या माळ्यावर आग लागली. येथील १२ पुरुष आणि दोन महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. या आगीत सुमारे २५ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान टळले. अभ्यंकरनगर व्हीएनआयटी चौक, क्रीडा चौक, वैभवनगर, जरीपटका पोलीस ठाण्याजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. पांडे लेआऊटमधील प्रणव ३ अपार्टमेंटमध्ये दिव्यामुळे लागलेली आग, व्हेरायटी चौकात गेसन्ससमोर, गुरुदेव नगरातील राजीव गांधी सभागृहासमोरील, वर्धमान नगरातील रेसिडेन्स हॉस्पिटलसमोरील, छोटा ताजबाग एम्पायर बारजवळ, गांधीबाग पोलीस क्वॉर्टर, मोतीबाग पाचपावली रेल्वे गेटजवळ, गीतांजली टॉकीजजवळील, वंजारीनगर येथे भंगार ऑटोला,गोरेवाडा वॉटर फिल्टर प्लान्टजवळ आदी ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि शहरात होणारी कोटय़वधी रुपयाची हानी टळली.

दिवाळीच्या दिवसांत आगीच्या घटना घडत असतात. मात्र, याबाबत महापालिकेच्या अग्निशमन विभागाने वेळोवळी जनजागृती केली आहे. यावेळी दिवाळीत तुरळक घटना वगळता कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. तत्परता दाखवणारे अग्निशमन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून काम केले. त्यामुळे मोठे नुकसान टळले.

– नंदा जिचकार, महापौर

First Published on November 9, 2018 2:57 am

Web Title: in two days fire in 20 places