केंद्राची रचना बघून वनमंत्रीही अवाक्

जखमी व आजारी वन्यजीवांच्या आरोग्यात सुधारणाच नव्हे तर या सुधारणेनंतर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणारे देशातील पहिले ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ तयार करण्याचा मान उपराजधानीने पटकावला. तांत्रिक आणि वनखात्याचे निकष पूर्ण करीत तयार झालेल्या या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन मंगळवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. वन्यजीवांसाठीच्या या पहिल्यावहिल्या अत्याधुनिक केंद्राची निर्मिती पाहून वनमंत्रीही अवाक् झाले.

भारतात वन्यजीवांवरील उपचाराकरिता अनेक बचाव केंद्र आहेत. काही दिवसांपूर्वीच गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील बचाव केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. मात्र, उपचारानंतर वन्यजीवांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्याची व्यवस्था या कोणत्याही केंद्रात नाही. त्यामुळे उपचारानंतर पिंजऱ्यातच प्राणी पडून राहण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढीस लागले होते. त्यातूनच ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची संकल्पना मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी मांडली आणि वनखात्याचे तत्कालीन प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी या केंद्रासाठी पुढाकार घेत निधी मंजूर करुन दिला.

या केंद्राच्या माध्यमातून नागपुरातूनच नव्हे तर कोणत्याही वनक्षेत्रातून येणाऱ्या वन्य प्राणी आणि पक्ष्यांवर योग्य उपचार होऊन त्यांना त्यांच्या मुळ अधिवासात परत सोडावे, अशी अपेक्षा यावेळी वनमंत्र्यांनी व्यक्त केली. अपघातस्थळावरून जखमी वन्यप्राण्यांना आणण्यासाठी किंवा मानव-वन्यजीव संघर्षांत अडकलेल्या वन्यप्राण्यांच्या सुटकेसाठी अत्याधुनिक टाटा कंपनीचे वाहन खास तयार करुन घेण्यात आले आहे. या वाहनात उंच झाडावर अडकलेल्या पक्ष्याला काढण्यासाठी शिडीपासून तर प्राण्यांना योग्यस्थळी हलविण्याकरिता किंवा त्यांना पकडण्याकरिता लागणारे साहित्य आहे. याशिवाय प्रथमोपचाराचे साहित्यही वाहनातूच असून या वाहनात एक डॉक्टरसुद्धा उपलब्ध असणार आहे. या वाहनाची पाहणी वनमंत्र्यांनी केली आणि वाहनाची एकूणच रचना पाहून आश्चर्य व कौतुकमिश्रित मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला वनखात्याचे सचिव विकास खारगे, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सर्जन भगत, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) ए.एस. सिन्हा, प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक टी.एस.के. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक व पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक जयती बॅनर्जी, मंत्रालयातील वनखात्यातील अधिकारी वीरेंद्र तिवारी, पी.के. महाजन, माजी मानद वन्यजीव रक्षक गोपाळ ठोसर आदी मान्यवर होते. या कार्यक्रमाला वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.