-रवींद्र जुनारकर
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यातील नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेल्या ग्रामपंचायतीत यशस्वीपणे निवडणूक प्रक्रिया राबविल्याबद्दल विशेष प्रोत्साहनपर निधी (इंन्सेटिव्ह) देण्यासाठी प्रस्ताव मागितले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख गुरूवारी गडचिरोली येथे आले असता जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतींना किमान पाच ते दहा लाखांचा प्रोत्साहनपर भत्ता मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सी-६० पथकातील कमांडोंसाठी ४ हजारांचा प्रोत्साहनपर भत्ता ८ हजार करण्यासाठीही प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने गृहमंत्री अनिल देशमुख गुरूवार २८ जानेवारी रोजी नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अहेरी येथे प्राणहिता पोलीस मुख्यालय तथा गडचिरोली जिल्हा मुख्यालयात बैठक घेतली. गृहमंत्री देशमुख यांनी ३२० ग्राम पंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल जिल्हा प्रशासन तथा पोलीस दलाचे कौतूक केले. गृहमंत्री केवळ कौतूक करूनच थांबले नाही, तर त्यांनी नक्षलग्रस्त ग्रामपंचायतींना विशेष बक्षिस देण्याचे जाहीर केले. त्यानुसार गृहमंत्र्यांनी विशेष प्रोत्साहनपर निधी देण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा केली.
शासन स्तरावर पाच ते दहा लाख रूपये अशा पध्दतीने बक्षिस देता येते, तेव्हा तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांना गृहमंत्र्यांनी दिले. तसेच सी ६० कमांडो यांना ४ हजार रूपये इंन्सेटिव्ह दिले जाते. आता हे इंन्सेटिव्ह ८ हजार रूपये करण्याचेही गृहमंत्र्यांनी जाहीर केले. गृहमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी सिंगला यांनी प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सिंगला यांच्याशी संपर्क साधला असता, “गृहमंत्री देशमुख यांनी ग्राम पंचायतसाठी तसा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. त्यानुसार नक्षलवादग्रस्त भागातील १०० ग्राम पंचायतींचा प्रस्ताव आम्ही पाठवित आहोत. प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी लोकसंख्येनुसार ५ ते १० लाखाचा प्रस्ताव पाठविणार आहे,” अशी माहिती त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ग्रामपंचायतींना पाच ते दहा लाखांच्या स्वरूपातील प्रोत्साहनपर निधी मिळाला तर गावात विकास कामे घेता येईल, असा आशावाद सिंगला यांनी व्यक्त केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 2:37 pm