मंगेश राऊत

पेट्रोल-डिझेल टँकर चालकांशी चोरटय़ांचे संगनमत

सर्वसामान्य लोक विचारही करू शकत नाही, अशा विविध व्यवसायात असामाजिक तत्त्वांनी पाय पसरले असून खापरी परिसरातील तेल डेपोलगत ‘फर्निस ऑईल’चोरीचा व्यवसाय झपाटय़ाने फोफावत आहे. यासाठी चोरटय़ांसोबत पेट्रोल आणि डिझेल टँकर चालकांशी संगनमत केले असल्याची माहिती आहे.

अनेक वर्षांपूर्वी गुन्हेगार हप्ता वसुली, जुगार अड्डे, अंमली पदार्थ आणि सोन्याची तस्करी आदी व्यवसायात गुंतले होते. कालांतराने इमारत बांधकाम व भूखंड विक्री व्यवसायात अधिक पैसा असल्याचे कळल्यावर ते या व्यवसायात शिरले. बंदूक व बळाच्या लोकांकडून कमी पैशात भूखंड बळकावणे व त्याची विक्री करण्याचे काम करू लागले. कालांतराने अन्नधान्याची भेसळ, सुपारी तस्करी, ट्रान्सपोर्टेशन आदी व्यवसायांमध्येही आता गुन्हेगारांनी शिरकाव केला असून आता पेट्रोल व डिझेलशी संबंधित असलेल्या व्यवसायांमध्ये त्यांनी हातपाय पसरले आहे. विविध ऊर्जानिर्मिती प्रकल्प, स्टील उद्योग आणि इतर कारखान्यांमधील बॉयलरमध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘फर्निस ऑईल’ चोरीचा नवीन बाजार उदयास येत आहे. शहरातील ऑईल डेपो असलेल्या खापरी परिसरात या ऑईलच्या चोरीचा बाजार फोफावत असून स्थानिक पोलीस जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती दिली.

एक टँकर ५-७ लाखाला

जळालेले ऑईल आणि पेट्रोल मिसळले की फर्निस ऑईल तयार होते. त्यामुळे चोर पेट्रोल व डिझेलच्या टँकरचालकांसोबत संगनमत करतात व टँकरमधूनच पेट्रोल काढतात. त्यानंतर चोरीच्या जळालेल्या ऑईलमध्ये मिसळतात. एक टोळी महिनाभरात जवळपास दोन टँकर फर्निस ऑईल तयार करते आहे. एक टँकर जवळपास ते ५ ते ७ लाख रुपयांना विकतात. खासगी कारखानदार व ऊर्जा प्रकल्पही त्यांच्याकडून हे ऑईल खरेदी करतात. या व्यवसायात अख्तर आणि बबलू या चोरटय़ांचा मोठा सहभाग आहे. त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न आहे.

चौकशी करणार

ऑईल चोरीच्या प्रकाराची नवीन माहिती समोर येत आहे. त्यादृष्टीने चौकशी केली जाईल आणि संबंधित चोरीचा प्रकार भादंविसह इतर कोणत्या कायद्यांतर्गत येतो, याचा अभ्यास करून चोरटय़ांना बेडय़ा ठोकण्यात येईल.

–  विवेक मासाळ, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१