महेश बोकडे

विदर्भातील शासकीय व खासगी रुग्णालयांत उपलब्ध ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि व्हेंटिलेटर खाटांच्या तुलनेत अत्यवस्थ रुग्ण अधिक असल्याने अनेकांना विलंबाने खाटा मिळत आहेत. येथे मृत्यू वाढण्याला तेही एक कारण असल्याचा अंदाज  वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

विदर्भात सध्या १०,४८१ ऑक्सिजन, ३,८९३ अतिदक्षता आणि १,७६७ व्हेंटिलेटरच्या खाटा आहेत. त्यात थोडी वाढ झाली. परंतु ही संख्याही कमी आहे. खाटा कमी असल्याचा मुद्दा प्रशासनाने नाकारला आहे. सरकारच्या कोविड डॅशबोर्डनुसार, विदर्भातील एकूण खाटांमध्ये नागपूर जिल्ह्यातील सामान्य आयसोलेशन खाटा वगळून ४,३६६ ऑक्सिजन, १,९०३ अतिदक्षता आणि ७४४ व्हेंटिलेटर खाटांचा समावेश आहे. इतर दहा जिल्ह््यांत ऑक्सिजनच्या ६,११५, अतिदक्षता विभागाच्या १,९९० आणि व्हेंटिलेटरच्या १,०२३ खाटा आहेत.  विदर्भात रोज १२ ते १५ हजार नवीन रुग्णांची भर पडत असून दीडशेहून अधिक मृत्यू होत आहेत. ८ एप्रिल ते ११ एप्रिलदरम्यान विदर्भात ९९५ रुग्णांचा मृत्यू झाला. पूर्वी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियात निवडक मृत्यूंसह नवीन रुग्णसंख्याही कमी होती.

गडचिरोलीत आयसोलेशनच्या सामान्य खाटा वगळून ऑक्सिजनच्या ५६२ खाटा, अतिदक्षता विभागातील ११९, व्हेंटिलेटरच्या ६५ खाटा आहेत. चंद्रपूरला ऑक्सिजनच्या ५५६, अतिदक्षता विभागाच्या १४४, व्हेंटिलेटरच्या ९३ खाटा आहेत. भंडाऱ्यात ऑक्सिजनच्या ३२९, अतिदक्षता विभागातील २०४, व्हेंटिलेटरच्या १०७ खाटा आहेत. गोंदियात ऑक्सिजनच्या ४९९, अतिदक्षता विभागाच्या १२७, व्हेंटिलेटरच्या ७७ खाटा आहेत. यवतमाळलाही ऑक्सिजनच्या ४८८, अतिदक्षता विभागाच्या १६३, व्हेंटिलेटरच्या ८७ खाटा आहेत. तर या जिल्ह््यांमध्ये खाटांच्या तुलनेत गंभीर रुग्ण रुग्णालयांत वाढत आहेत. पूर्वी येथील जास्तच प्रकृती खालावलेले रुग्ण नागपूरला येत होते. परंतु सध्या नागपुरात ६२ हजारांवर उपचाराधीन रुग्ण असून त्यातील साडेसात हजार गंभीर रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत. त्यामुळे नागपुरातील प्रकृती खालावलेल्या नवीन रुग्णांना खाटा मिळवण्यात अडचणी येत आहेत. इतर जिल्ह्यातील येथे हलवलेल्या जाणारे रुग्ण कमी झाले.  खाटा नसल्याने नागपूरच्याच काही रुग्णांना अमरावतीला हलवावे लागले. नागपूरच्या काही रुग्णांनी विदर्भातील मिळेल त्या जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल होत उपचार सुरू केला. त्यामुळे हल्ली विदर्भात मृत्यू वाढण्याला अत्यवस्थ रुग्णांच्या तुलनेत खाटांची मर्यादाही एक कारण असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात बोलले जात आहे. सोबतच वैद्यकीय महाविद्यालय नसलेल्या जिल्ह्यात तज्ज्ञांची कमी आहे. त्याचाही परिणाम होत आहे. नागपूर आणि अकोलाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयांतील काही अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर शासनाकडून आवश्यक खाटा वाढवण्याचे नियोजन सातत्याने होत असून येथे खाटांची कमतरता नसल्याचा दावा केला.

‘‘विदर्भातील अकरापैकी बहुतांश जिल्ह््यांत करोनाच्या पहिल्या लाटेच्या अनुभवानंतरही शासनाने स्वतंत्र जंबो कोविड रुग्णालय उभारण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आता अत्यवस्थ रुग्णांच्या तुलनेत ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरच्या खाटा कमी पडत आहेत. पूर्वी इतर जिल्ह्यातील अत्यवस्थ करोनाग्रस्त नागपूरात उपचाराला यायचे. परंतु नागपुरातच रुग्ण वाढल्याने येथील रुग्ण बाहेर  जात आहेत.  उपचारासाठी रुग्ण बरेच दिवस ताटकळकत राहत असल्याने विदर्भात मृत्यू वाढल्याचा अंदाज आहे. आतातरी तातडीने जंबो कोविड रुग्णालय उभारण्याची गरज आहे.’’

– डॉ. उदय बोधनकर, कार्यकारी संचालक,  (कोमहाड)