१६३ पैकी १४९ शाळांमध्ये नगरसेवकांनीच झेंडा फडकाविला

‘बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानांतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असताना यंदा काही शाळांचा अपवाद सोडला तर बहुतांश ठिकाणी नगरसेवकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महापालिकेच्या सिव्हिल लाईनमधील मुख्य कार्यालयात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महापालिकेच्या १६३ शाळा असून त्यापैकी केवळ १४ शाळेतच विद्यार्थिनींनी ध्वज फडकावला.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सर्वसामान्यपणे राजकीय नेते, समाजातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. महापालिका शाळेतही नगरसेवक किंवा मुख्याध्यापक ध्वजारोहण करीत होते. गेल्यावर्षी तत्कालीन शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानातंर्गत शाळेतील गुणवत्ताप्राप्त किंवा क्रीडा व अन्य क्षेत्रात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला होता व त्याची अंमलबजावणीही केली होती. त्याचप्रमाणे महापालिकेच्या मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहण विद्यार्थिनींच्या हस्ते करण्याचा निर्णय तत्कालीन महापौर प्रवीण दटके यांनी घेतला होता आणि त्याची गेल्यावर्षी अंमलबजावणी झाली. या अभिनव उपक्रमाचे देशभर कौतुक झाले होते. अशा पद्धतीचा उपक्रम राज्यात केवळ नागपूर महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आल्याचा दावा करून पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती.

महापालिकेत तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी सुरू केलेली योजना यावेळी सुरू राहील अशी अपेक्षा होती. शिक्षण विभागाने त्याबाबत आठ दिवस आधी आदेश काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, शहरातील काही महापालिकेच्या शाळांमध्ये चौकशी केली असता ते मिळाले नसल्याचे सांगून नगरसेवकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.

शाळांना पत्र पाठविले होते

सर्व शाळांना विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, या संदर्भात निर्देश देण्यात आले होते आणि तसे पत्र पाठवण्यात आले होते. परंतु काही शाळांना मिळाले नसल्याच्या तक्रारी असेल तर त्याबाबत माहिती घ्यावी लागेल. बहुतेक शाळांमध्ये नगरसेवकांसह मुलींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ज्या शाळेत झाले नसेल त्याची माहिती घेतली जाईल.

संध्या मेडपल्लीवार, शिक्षणाधिकारी, महापालिका

चांगला उपक्रम मोडीत

प्रत्येक शाळेतील हुशार मुलगी किंवा त्या शाळेची गरीब होतकरू मुलगी यांच्याकडून त्यांच्या आई-वडिलांसमक्ष ध्वजारोहण व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शिवाय ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या संकल्पनेतून मुलींचा सन्मान करून त्यांना गौरविण्याचा शिक्षण विभागाचा मानस होता. समाजामध्ये मुलींचा सन्मान व्हावा, या उद्देशाने महापालिका शाळेतील एका विद्यार्थिनीची निवड करून तिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते आणि त्याचे कौतुक झाले होते. यावर्षी का राबविला नाही, याची मात्र कल्पना नाही.

गोपाल बोहरे, माजी शिक्षण सभापती, भाजप नेते