’ दक्षिण अफ्रिकेच्या डॉ. जॉन ओमा यांचे मत ’ मेंदूरोग तज्ज्ञांची ‘निसिकॉन’ परिषद

पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत भारतात अद्ययावत वैद्यकीय सेवा फार कमी दरात उपलब्ध आहे. येथे उपचाराकरिता व्हिसा मिळण्याची प्रक्रियाही सोपी असून प्रत्येक वर्षी विदेशातून उपचाराकरिता येणारे रुग्ण वाढत आहे. येथील वैद्यकीय क्षेत्राची समाधानकारक प्रगती बघता येथे वैद्यकीय पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे, असे मत दक्षिण अफ्रिकेचे सुप्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. जॉन ओमा यांनी व्यक्त केले.

न्यूरॉलॉजीकल सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित चार दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नागपूरला आले असता शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतात अपघातासह अपस्मार, रक्तदाब व इतर कारणांमुळे मेंदूला संसर्गासह इजा होण्याचे प्रमाण जास्त आहे. तर दक्षिण अफ्रिकेमध्ये या आजारांच्या व्यतिरिक्त एचआयव्हीचे संसर्गजन्य रुग्ण जास्त आहेत. एड्समुळे रुग्णांमध्ये क्षयरोगासह इतर आजाराची गुंतागुंत वाढून मेंदूचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे. परंतु त्यामानाने या देशात मेंदूरोग तज्ज्ञांची संख्या कमी आहे. त्यामुळे रुग्णांचा डॉक्टरांवर प्रचंड ताण आहे. ही संख्या हळूहळू वाढत असून त्या देशातही वैद्यकीय क्षेत्राची सर्व मदार खासगी डॉक्टरांवर आहे. दक्षिण आफ्रिकेत जवळपास ९५ टक्के डॉक्टर हे खासगी दवाखाने व रुग्णालयाच्या मदतीने रुग्णसेवा देतात.

आफ्रिकन देशात आधुनिक वैद्यकीय सुविधा कमी असल्यामुळे गंभीर आजाराचे बरेच रुग्ण उपचाराकरिता इतर देशात जातात. अमेरिका व युरोपमध्ये या रुग्णांना डॉक्टरांची विलंबाने मिळणारी अपॉईंटमेन्ट, महागडे उपचार आणि व्हिसासाठी असलेली किचकट प्रक्रिया बघता भारतात उपचार घेणे जास्त सुविधाजनक आहे. पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत भारतात  चांगली वैद्यकीय सुविधा, उपकरणे व तज्ज्ञ डॉक्टर फार कमी दरात उपलब्ध आहे. त्यामुळे आफ्रिकन कुटुंबाला रुग्णासह भारतात येऊन उपचार घेणे परवडते, असे डॉ. जॉन ओमा यांनी सांगितले. भारताप्रमाणेच दक्षिण अफ्रिकेतही सरकारच्या दुर्लक्षामुळे वैद्यकीय संशोधन कमी असल्याचे त्यांनी मान्य केले.

‘अल्ट्रासाऊंडचा आधारे मेंदूतील गाठी काढणे शक्य’

मेंदू, घसा, मानेच्या वर होणाऱ्या कर्करोगावर शल्यचिकित्सा करताना गुंतागुंत वाढते. शरिरावर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जासंस्थेचा हा मार्ग असल्याने यावर उपचार करताना जोखीम मोठी असते. पूर्वी मेंदूच्या ज्या भागांपर्यंत पोहचणे अशक्य मानले जायचे त्या भागात दुर्बिणीद्वारे पोहचून शल्यक्रिया शक्य झाल्या आहेत. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आधारे कॅथेटर टाकून देखील शल्यक्रिया होत आहे. अमेरिकेत सध्या मेंदूत होणाऱ्या रक्ताच्या गाठी दूर करण्यासाठी स्टेंटचा वापर होऊ शकतो काय? यावर संशोधन सुरू आहे. मेंदूच्या कर्करोगावर उपचार करताना आता सरसकट रेडिएशन करण्याऐवजी क्षतिग्रस्त भागावर फोकस सर्जरी शक्य झाली आहे. अल्ट्रासाऊंडचा आधार घेऊन मेंदूतील गाठी, फायब्रॉईंडच्या गाठी दूर करणे शक्य झाले असून अमेरिकेत त्यावर चाचण्या सुरू असल्याची माहिती, अमेरिकेतील मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. विल्यम कुडविल यांनी दिली.