विमानातील प्रवाशांना सुरक्षित पोहोचवण्यासाठी  कुशल वैमानिकाची गरज असते, तसेच देशाला योग्य दिशने नेण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पायलट म्हणून अपयशी ठरले आहेत. त्यांच्या हातात देश अधिक काळ ठेवणे धोक्याचे आहे, अशी प्रखर टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.

अकोला येथे एका कार्यक्रमाला जाण्यासाठी पटेल यांचे आज सकाळी नागपूर येथे आगमन झाले. त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. तेथून  बाहेर पडताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाम्. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांत मोदी सरकार सर्वच आघाडय़ावर अपयशी ठरले आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी केलेल्या पीएनबी घोटाळ्याची माहिती मोदी यांना होती. मात्र त्यांनी काहीही केले नाही. आता ते आपला नाईलाज असल्याचे सांगतात. घोटाळ्याची पूर्वकल्पना असताना मौन बाळगणे हा देशद्रोह ठरत नाही काय? असा सवाल करीत आता त्यांच्या हातात देश ठेवणे धोक्याचे ठरेल, असेही ते म्हणाले. नरेंद्र मोदींबद्दल लोकांना मोठय़ा अपेक्षा होत्या. शेतकऱ्यांना दुप्पट भाव देऊ, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, अशी आश्वासने त्यांनी दिली होती. प्रत्यक्षात या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या. विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. देशातील सध्याचे चित्र पाहून आता जनताच ‘‘कुठे आहे अच्छे दिन’’ असा सवाल विचारत आहे.