२३ मेला सकाळी ८ पासून सुरुवात,  विधानसभा मतदारसंघनिहाय मोजणी

नागपूर : लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट परिसरात होणार असून या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० व्हिडीओग्राफरची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्वीन मुद्गल यांनी सांगितले.

आज मंगळवारी छत्रपती सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेताना ते बोलत त होते. दरम्यान प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात झाल्यावर पहिला कौल तासभरात मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. कळमना मार्केट परिसरात मतमोजणीसाठी दोन स्वतंत्र हॉल तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. २३ मे रोजी सकाळी ६.३० वाजता विविध राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमचे सील उघडण्यात येईल.

त्यानंतर  सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. प्रारंभी टपाल मतपत्रिकांची (पोस्टल बॅलेट) मोजणी झाल्यानंतर ८.३० वाजता ईव्हीएममधील मतांची मोजणी  होईल. मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय होणार असून यासाठी प्रत्येकी १४ टेबल लावण्यात येतील.  या बैठकीला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, अविनाश कातडे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, अन्न धान्य वितरण अधिकारी लीलाधर वार्डेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र भुयार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहसंचालक एस.आर. केकरे, लेखाधिकारी विनित तिवारी आदी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना कामाचे वाटप

जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या दिवशीचे कामाचे वाटप केले आहे. त्यानुसार कर्मचारी प्रशिक्षण- उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, मनुष्यबळ व्यवस्थापन-अविनाश कातडे, फेरीनिहाय मतमोजणी-मिलिंद नारिंगे, केंद्रावरील पायाभूत सुविधा -जनार्दन भानुसे, वाहन व्यवस्था, -लीलाधर वार्डेकर, भोजण- प्रशांत काळे, एस.आर. केकरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

अशी होईल मोजणी

स. ६.३० वा. ईव्हीएमचे सील उघडणे

स. ८ वा. टपाल मतपत्रिकांची (पोस्टल बॅलेट) मोजणी

स. ८.३० वा. प्रत्यक्ष मतमोजणी