भारतीय संस्कृतीचा उगम सिंध प्रांतातून आहे. सिंधी भाषेची सुरक्षा म्हणजे भारताची सुरक्षा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

भारतीय सिंधू सभेतर्फे जरीपटका येथील दयानंद पार्क येथील आयोजित चेट्रीचंड महोत्सवात विशेष अतिथी म्हणून सरसंघचालक डॉ. भागवत बोलत होते. यवेळी मंचावर सिंध सभेचे अध्यक्ष घनश्यामदास कुकरेजा, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सतीश आनंदानी, राजेश बरवानी, सुनील वासवानी, दीपक बिखानी, अमिल भारद्वाज उपस्थित होते.

भारतात निरनिराळ्या भाषा, प्रांत आहेत. प्रत्येक प्रांताचे खाद्य वेगवेगळे आहे, परंतु या साऱ्या बाबी आम्हाला एका देशाशी जोडतात. प्रांत सभ्यता हे भारताचे बलस्थान आहे. प्रत्येक उत्सवाची विविधता आहे. मात्र, या साऱ्यामागची भावना एक आहे. विविधतेला एकतेच्या भावनेला सोबत घेऊन चालणे ही आमची संस्कृती आहे. १४ ऑगस्ट हा दिवस सिंधी समाज काळा दिवस म्हणून पाळत असले तरी भविष्यात सिंधच्या भूमीवर राहून त्याच दिवशी संत कंवरराम यांची भजन सिंधी बांधव गातील आणि तो दिवस शुभ असेल असेही ते म्हणाले. प्रास्ताविक घनश्यामदास कुकरेजा यांनी केले. श्रीमती सचदेव यांनी संचालन केले.