शासकीय रुग्णालयालाही साहित्याची मदत – डॉ. झुनझुनवाला

नागपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (आयएमए) मिशन ह्य़ुमॅनिटी उपक्रमाअंतर्गत टाळेबंदीत नागपुरात अडकून पडलेल्या १५ हजार स्थलांतरित मजुरांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिले गेले. सोबत शासकीय रुग्णालयांना एन- ९५ मास्क, सॅनिटायझरसह इतरही साहित्यांची मदत केली गेली, तर महिला मजुरांना सॅनिटायझर नॅपकीन उपलब्ध करण्यात आले, अशी माहिती पत्रकार परिषदेत आयएमएचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला व सचिव डॉ. मंजूषा गिरी यांनी दिली.

करोनावर औषध नाही. परंतु पहिल्या टप्प्यात उपचाराला आलेला रुग्ण हमखास बरा होतो. या रुग्णांचा मृत्यूदरही खूप कमी आहे. रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे, रक्तदाब, मधुमेह, कर्करुग्ण असलेल्यांना करोनाची जोखीम अधिक आहे. करोनामुक्त व्यक्तीही समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यावर बहिष्कार चुकीचे असून त्याचा प्रत्येकाने स्वीकार करायला हवा. हे रुग्ण प्लाझ्मा थेरपीसाठी महत्त्वाचे आहेत. त्यांनी प्लाझ्मा दान दिल्यास अनेकांना जीवदान मिळू शकते, असे डॉ. झुनझुनवाला म्हणाले. प्रत्येकवर्षी महापालिका खासगी रुग्णालयांच्या परवान्याचे नूतनीकरण करते. यंदा करोनाच्या कामात महापालिकेचे अधिकारी व्यस्त असल्याने अनेकांचे नूतनीकरण झाले नाही.

या रुग्णालयांना करोना नियंत्रणापर्यंत नवीन परवाना देण्याची मागणी आयएमएने केली आहे. एखाद्या खासगी रुग्णालयात बाधित आढळल्यास ४८ तासात ते रुग्णांसाठी खुले करण्याची आयसीएमआरची मार्गदर्शक सूचना आहे. त्यामुळे येथे उपचाराला रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही. मनपानेही  या रुग्णालयांना वेठीस धरणे वा बदनाम होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. अशोक अढाव म्हणाले.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्व खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या कमी होण्यासह सगळ्यांचे उत्पन्न नाहीसे झाले आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना वेतन द्यायचे कुठून, हा प्रश्न निर्माण झाल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले. याप्रसंगी डॉ. मिलिंद नाईक, डॉ. वाय.एस. देशपांडे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. आशीष दिसावल उपस्थित होते.