नवतपाला दहा दिवसांचा कालावधी उरला असताना पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लहरींचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही शहरात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसांच्या हलक्या सरी डोकावत असल्या तरी नागपूरसह, चंद्रपूर, वर्धा, अकोला आदी शहरात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. नागपूर शहरात ते ४५ अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहे. तरीही वरील शहरांमध्ये मात्र तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून उष्णतेच्या लहरींचा इशारा देण्यात आला आहे.

मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात म्हणजेच २५ मे पासून नवतपा सुरू होतो. या काळात तापमान ४७-४८ अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा जाते. नवतपाला दहा दिवस उरले असले तरीही हवामान खात्याने या आठवडय़ात दोन-तीन दिवस उष्णतेच्या लहरी राहतील, असा अंदाज दिला आहे. अकोला, चंद्रपूर, वर्धा ही शहरे ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचतील. तर किमान तापमानसुद्धा ३०-३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचेल. सूर्य डोक्यावर आल्यास तापमान वाढते आणि सध्या विदर्भात हीच स्थिती आहे. चंद्रपूर शहरात १८, १९ मे दरम्यान सूर्य डोक्यावर येईल तर नागपूर शहरात जूनच्या १, २ तारखेपर्यंत सूर्य डोक्यावर येईल. दरम्यान, याच काळात नवतपा सुरू होतो. तेलंगणाकडे सायक्लोनची स्थिती असल्यामुळे पूर्व आणि पश्चिम चंद्रपूर भागात आभाळी वातावरण आहे. त्याचा तापमानावर फारसा फरक पडणार नाही. गेल्या दोन दिवसांपासून नागपूर शहरातही आभाळी वातावरण अधूनमधून डोकावत असले तरीही दिवसा मात्र प्रचंड उन्हाचा तडाखा नागरिकांना बसतो आहे. सायंकाळीसुद्धा गरम वारे जाणवत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लहरींचा सामना विदर्भातील जवळजवळ सर्वच शहरातील नागरिकांना करावा लागणार आहे. ब्रम्हपुरी शहरातसुद्धा तापमान ४६ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले. त्यामुळे आज, उद्या उष्णतेच्या तीव्र लहरींमधून नागरिकांना जावे लागणार आहे. दरम्यानच्या काळात एक-दोन दिवस थोडा दिलासा मिळण्याची शक्यता असली तरीही नवतपाच्या काळात पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.