महेश बोकडे

काव्य आणि सिनेगीतांनी ज्या ‘हृदया’चा अव्याहत आधार घेत अजरामर रचनांचे डोंगर उभारले गेले, त्याच भारतभूमीतील नागरिकांचे हृदय पाश्चिमात्य देशातील नागरिकांपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी लहान असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. हा अभ्यास अमेरिकेतील ‘द इंटरनॅशनल जनरल ऑफ कार्डिओव्हॅस्कुलर इमेजिंग’मध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शांतनू सेनगुप्ता यांच्या नेतृत्वात सलग चार वर्षे देशातील सहा विविध केंद्रांवर भारतातील सुमारे १ हजार व्यक्तींच्या हृदयाचा सूक्ष्म अभ्यास केला गेला असता ही बाब प्रकर्षांने समोर आली.

नागपुरातील सेनगुप्ता हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट, ठाणे येथील ज्युपीटर हॉस्पिटल, गुरुग्राम येथील वेदांता, दिल्ली येथील फोर्टिस हॉस्पिटल, कोलकाता येथील रवींद्रनाथ टागोर हॉस्पिटल, इंदोर येथील सीएचएल हॉस्पिटल या अभ्यासात सहभागी होते. या सहा केंद्रांमध्ये २०१६ ते २०१९ दरम्यान उपचाराला येणाऱ्या १ हजार सामान्य संवर्गातील रुग्णांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली. त्यात सर्वाधिक ४०० रुग्ण नागपुरातील होते.  या संशोधनामुळे लहान हृदयाबाबत आणखी अभ्यास करून नव्या उपाययोजना शोधून काढण्यास उपयोग होईल, असे मत डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी व्यक्त केले. या संशोधनात ठाण्याहून डॉ. नितीन बुरकुळे, गुरुग्रामहून डॉ. मनीष बंसल, नवीन दिल्लीहून डॉ. जे. सी. मोहन, इंदोरहून डॉ. अतुल करांडे, कोलकाताहून डॉ. देबिका चॅटर्जी सहभागी झाल्या होत्या.

संशोधनातील निष्कर्ष..

या तपासणीच्या अहवालात संबंधितांच्या हृदयाची उंची, रुंदी, आकारासह वजनाचा अभ्यास करण्यात आला. त्यात भारतीयांचे हृदय आकार आणि वजनाने १५ ते २० टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सध्या पाश्चिमात्य देशातील पुरुषाचे हृदय ३०० ते ३५० ग्रॅम, महिलांचे २५० ते २८० ग्रॅम आहे. भारतातील पुरुषाचे हृदय ३०० तर महिलांचे हृदय २५० ग्रॅम इतके आहे.

पहिल्यांदाच असे संशोधन..

विकसित देशांमध्ये सातत्याने हृदयासह इतरही अवयवांवर या पद्धतीचा अभ्यास केला जातो. देशात प्रथमच असा अभ्यास झाला असून त्यात भारतीयांचे हृदय पाश्चिमात्य देशातील नागरिकांहून आकाराने कमी असल्याचे पुढे आले आहे. या संशोधनामुळे देशात हृदयाच्या चाचणीसह इतरही निकषात गरजेनुसार बदल करता येतील, असे नागपूरच्या सेनगुप्ता हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटचे डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी सांगितले.