News Flash

वाघांची संख्या तिपटीने वाढण्याची भारताची क्षमता

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच वाघांची संख्या आणि त्यांचे क्षेत्र जवळजवळ ९५ टक्क्यांनी कमी झाल्याचे लक्षात येते.

वाघांची संख्या तिपटीने वाढण्याची भारताची क्षमता
(संग्रहित छायाचित्र)

भारतासह संपूर्ण आशियातील वाघांची संख्या कमी झालेल्या अधिवासक्षेत्रात त्यांची संख्या तिपटीने वाढण्याची क्षमता आहे. व्याघ्र संवर्धन कार्यक्रमांतर्गत या ठिकाणी केलेल्या प्रयत्नांमुळे जागतिक पातळीवर  वाघांच्या संख्येत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती जागतिक वन्यजीव निधीच्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) नव्या अभ्यासातून पुढे आली आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच वाघांची संख्या आणि त्यांचे क्षेत्र जवळजवळ ९५ टक्क्यांनी कमी झाल्याचे लक्षात येते. जागतिक पातळीवर २०१० मध्ये वाघांची संख्या ३,२०० वर पोहोचल्यानंतर वाघांचा अधिवास असणाऱ्या तेरा देशांनी ‘टीएक्सटू’ ही जागतिक परिषद घेतली. वाघांचे प्रत्येक अधिवासक्षेत्र चांगले असून त्यासाठी गांभीर्याने विशेष प्रयत्न  होणे आवश्यक असल्याचे मत त्यात व्यक्त करण्यात आले. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या जागतिक व्याघ्र संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत वाघांची संख्या कमी झालेल्या १८ क्षेत्रांची निवड करण्यात आली. यात भारतातील राजाजी राष्ट्रीय उद्यान, नंदूरबार वन्यजीव अभयारण्य, उत्तर भारतातील वाल्मीकी राष्ट्रीय उद्यान, पूर्व भारतातील मानस राष्ट्रीय उद्यान, मध्य भारतातील अचानकमार वन्यजीव क्षेत्र, सत्यमंगलम वन्यजीव अभयारण्य व व्याघ्रप्रकल्प, अनमलाई व्याघ्रप्रकल्प आणि दक्षिण भारतातील वझचल जंगलाचा समावेश आहे. परिणामकारक शिकार प्रतिबंधक प्रयत्न आणि वाघांना लागणारे खाद्य यांचा समतोल साधता आला तर याठिकाणी पुढील २० वर्षांत मोठय़ा प्रमाणावर वाघांची संख्या वाढू शकते. वाघांचे वास्तव्य असणाऱ्या दहा देशातील ४९ संवर्धन तज्ज्ञांनी या क्षेत्रांच्या केलेल्या अभ्यासानंतर ही बाब पुढे आली आहे. या १८ क्षेत्रांमध्ये सध्या १६५(११८-२७७) वाघ आहेत. याठिकाणी वाघांची संख्या ५८५(४५४-७३९) पर्यंत जाऊ शकते. म्हणजेच वाघांची संख्या तिपटीने वाढू शकते, असे या अभ्यासात म्हटले आहे.

जागतिक पातळीवर वाघांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढवता येऊ शकते, पण त्यासाठी व्याघ्र संवर्धनाची गरज आहे. १८ क्षेत्रांपैकी अनेक क्षेत्रात वाघ वाढण्याची क्षमता असून संख्या वाढतही आहे. तरीही दक्षिणपूर्व आशियात मात्र अजूनही थोडा त्रास होत आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि लोकांचे सहकार्य असेल तर वाघांच्या संख्येबाबतची स्थिती आपण पूर्ववत  करू शकतो.

– मार्गारेट किन्नरडे, वन्यजीव अभ्यासक प्रमुख, डब्ल्यूडब्ल्यूएफ

वाघांची संख्या वाढवण्यासाठी निवडलेले प्रत्येक अधिवासक्षेत्र चांगले आहे. वाघांची कमी झालेली संख्या वाढवण्यासाठी विशिष्ट योजनांवर सखोल प्रयत्न होणे आवश्यक आहे. नजीकच्या भविष्यात वाघांची संख्या वाढवता येईल, अशाच अधिवास क्षेत्राची आम्ही निवड केली आहे.

– अभिषेक हरिहर, अभ्यासक व जनसंख्याशास्त्र प्रमुख, पेन्थेरा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 2:44 am

Web Title: indias capacity to triple the number of tigers
Next Stories
1 सिकलसेल, एचआयव्हीग्रस्त, रुग्णांना एसटी प्रवास मोफत
2 सरकारी उदासीनतेमुळे वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू 
3 पायाभूत सुविधांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
Just Now!
X