डीसीजीआयकडून मंजुरीनंतरच चाचणी

नागपूर : करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठय़ा प्रमाणावर विषाणू संक्रमणाचा धोका वैद्यकीय क्षेत्राकडून व्यक्त होत आहे. त्यातच कोव्हॅक्सिन या लसीची लहान मुलांवरील  चाचणीही देशातील निवडक केंद्रांवर करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यात नागपूरच्या एका केंद्रावरही ही चाचणी होण्याचे संकेत मिळत आहेत. परंतु, ड्रग अथॉरिटी ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाल्यावरच या केंद्रावर चाचणीला सुरुवात होईल.

प्रस्तावित चाचणी २ ते १७ वयोगटातील मुलांमध्ये होण्याची शक्यता आहे. या चाचणीसाठी नागपूरच्या मेडिट्रिना रुग्णालयानेही प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खडतकर, डॉ. आनंद राठी, डॉ. आशीष ताजने यांच्यासह पाच जणांचे पथकही प्रयत्न करत आहे.

या विषयावर मेडिट्रिनाचे संचालक डॉ. समीर पालतेवार यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते म्हणाले, या प्रक्रियेसाठी कागदपत्र तयार करून ती पाठवण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असते.

चाचणीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर ड्रग अथॉरिटी ऑफ इंडियाकडून परवानगी येईल. ही परवानगी आतापर्यंत आम्हाला मिळाली नाही. परवानगी मिळाल्यास प्रत्यक्ष चाचणी किमान महिन्याभराच्या कालावधीत सुरू होईल. यापूर्वी मेडिट्रिना रुग्णालयाने प्रौढांवर कोव्हॅक्सिनची चाचणी घेतल्याचेही त्यांनी सांगितले.