05 August 2020

News Flash

Coronavirus : मेयोतील पाच डॉक्टरांसह १५ कर्मचारी विलगीकरणात!

करोनामुळे दगावलेला नागपूरचा पहिला रुग्ण ४ एप्रिलला मेयोच्या आकस्मिक विभागातून दाखल झाला.

संग्रहित छायाचित्र

दगावलेल्या करोनाग्रस्ताशी संपर्क * मुलगा, मुलीसह १७ जण मेडिकलमध्ये

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयात (मेयो) उपचारादरम्यान दगावलेल्या करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ५ डॉक्टरांसह एकूण १५ आरोग्य कर्मचाऱ्यांना सक्तीच्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे रुग्णाचा मुलगा, मुलगीसह एकूण थेट संपर्कातील १३ जणांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी मध्यरात्रीपासून हुडकून काढत मेडिकलमध्ये दाखल केले असून त्यांची तपासणी सुरू आहे.

करोनामुळे दगावलेला नागपूरचा पहिला रुग्ण ४ एप्रिलला मेयोच्या आकस्मिक विभागातून दाखल झाला. श्वसनाचा त्रास व इतर लक्षणे बघत त्याला करोनासाठीच्या वार्डात हलवले गेले. ५ एप्रिलला उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवागारात विशेष काळजी घेत हलवण्यात आला. त्याला करोना असल्याचे ६ एप्रिलच्या रात्री समोर येताच तो दाखल होऊन त्याचा मृतदेह शवागारात हलवण्यापर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या मेयोतील मुख्य वैद्यकीय अधिकारी व निवासी डॉक्टर मिळून एकूण ५ डॉक्टर, ५ परिचारिका आणि ५ चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा एकूण १५ जणांना सक्तीच्या विलगिकरणात ठेवले आहे. या सगळ्यांचे नमुने तपासणीच्या अहवालानंतरच त्यांना विषाणूची लागन झाली काय? हे स्पष्ट होईल. परंतु त्यांचा अहवाल नकारात्मक आल्यावरही त्यांना काही दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे.

दुसरीकडे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेला मुलगा, मुलगी, जावई व इतर नातेवाईक अशा तब्बल १३ जणांना तातडीने  पोलिसांच्या मदतीने महापालिकेच्या आरोग्य विभागाने हुडकून सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत मेडिकलमध्ये दाखल केले. त्यांच्या तपासणी अहवालानंतरच इतरांना या आजाराची लागण झाली काय? हे स्पष्ट होईल.

दाखल केलेल्यात आमदार निवासात मरकजच्या यादीतील पाच ते सहा जणांचाही समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. या रुग्णाचा शहराबाहेर प्रवासाचा इतिहास नसल्याने त्याला हा आजार झाला कसा? याबाबत आरोग्य विभागाकडून तातडीने माहिती काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आयुर्वेद डॉक्टरही मेडिकलमध्ये

दगावलेल्या रुग्णावर उपचार करणारा खासगी आयुर्वेदिक डॉक्टरलाही आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून तातडीने मेडिकलमध्ये दाखल केले आहे. त्याचा वैद्यकीय अहवाल आल्यावर करोनाची बाधा आहे काय? हे स्पष्ट होईल. अहवाल नकारात्मक आल्यावरही त्याला विलगीकरणात रहावे लागेल, तर दुसरीकडे मेयोतील करोनाच्या वार्डात रुग्णांवर उपचार करणाऱ्या व पीपीई किट घालणाऱ्या डॉक्टरलाही विलगीकरणात ठेवून त्यांचीही वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 1:18 am

Web Title: indira gandhi government medical college and hospital 15 employees with 5 doctors in isolation zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : ‘मरकज’हून परतलेल्यांकडून बिर्याणीची मागणी!
2 मुख्यमंत्र्यांचा रेल्वे कर्मचाऱ्याला दूरध्वनी
3 नियम पाळा, अन्यथा टाळेबंदीला मुदतवाढ! गडकरींचा नागपूरकरांना इशारा
Just Now!
X