28 March 2020

News Flash

पडित विहिरी, तुंबलेल्या गटारातील वायू मानवी पेशी मारत असल्याने मृत्यू

वायू मानवी शरिरातील पेशी मारत असल्याने मेंदूतील प्राणवायूचा पुरवठा खंडित होऊन हे मृत्यू होत असल्याचे पुढे आले

मेयोतील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे संशोधन
पडित विहिरी, तुंबलेल्या गटारांसह विविध खड्डे वा टँकमध्ये निर्माण होणाऱ्या वायूमुळे गुदमरून होणाऱ्या मानवी मृत्यूवर नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)च्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात एक संशोधन झाले. त्यात हा वायू मानवी शरिरातील पेशी मारत असल्याने मेंदूतील प्राणवायूचा पुरवठा खंडित होऊन हे मृत्यू होत असल्याचे पुढे आले. न्यायवैद्यकशास्त्राचे प्रा.डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले हे संशोधन इंडियन जर्नल ऑफ फॉरेंसिक मेडिसिन अ‍ॅन्ड टॉक्सिकॉलॉजीच्या जर्नलमध्येही प्रकाशित झाले, हे विशेष.
भारतासह जगभरात मोठय़ा प्रमाणावर पडित विहिरी, तुंबलेल्या व कुजलेल्या गटारी, कमी वापराच्या पाण्याच्या टाक्या, घरातील शौचालयांच्या टाक्या आढळतात. त्याच्या स्वच्छतेसाठी अनेकदा कामगारांना यात उतरवले जाते. यानंतर त्यांचा जीव गुदमरून काहींचा मृत्यूही होतो. हे मृत्यू शरिरातील नेमक्या कोणत्या बदलांमुळे होतात, त्यासाठी येथे दोन शवविच्छेदनासाठी आलेल्या व असल्या पद्धतीने मृत्यू झालेल्या दोन अन्य मृतदेहांचा अभ्यास करण्यात आला.
त्यात एका मेनहोलमध्ये पडून मृत्यू झालेल्या ३२ वर्षीय तरुणासह सेफ्टीक टँकमध्ये पडून मृत्यू झालेल्या ४० वर्षीय मृतदेहाचा समावेश होता. हा वायू निर्माण होत असलेल्या वेगवेगळ्या वास्तूंचाही डॉक्टरांनी अभ्यास केला. त्यात कामगार अशा ठिकाणी उतरल्यास त्यांना प्रथम तेथे कुजलेल्या अंडय़ासदृष्य वास येतो. तो श्वसनमार्गे शरिरात जाऊन थेट वेगवेगळ्या पेशींवर हल्ला करतो. या पेशी वायूच्या तीव्रतेनुसार मृत पावतात. या प्रक्रियेत शरीरात ऊर्जा निर्माण करणाऱ्या ‘मायटोकॉड्रियल’चा प्रभाव अचानक कमी होऊन मानवाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे मानवी मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा खंडित होतो. सोबत रक्तातील प्राणवायूचेही प्रमाण कमी होते.
त्यामुळे मृत्यू होतो. हा वायू ५०० पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) तिव्रतेचा असल्यास सुमारे ५ ते १० मिनिटातच बेशुद्ध होऊन मृत पावू शकतो. १००० पीपीएम तिव्रतेचा असल्यास त्याचा त्वरित मृत्यू होण्याची शक्यता असते. या व्यक्तीचा मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या फुफ्फुसाला सूज येऊन शरिराच्या इतरही काही भागांवर परिणाम होत असल्याचे शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान निदर्शनात येते. याप्रसंगी मृतदेहातून लघवी, रक्त, स्नायू, थाययोसल्फेटचे नमुने घेऊन ते न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवले जातात. त्या अहवालातून हा मृत्यू असल्या पद्धतीच्या वायूमुळे झाल्याचे निदर्शनात येते.

मृत्यू टाळणे शक्य
अशा ठिकाणी काम करणाऱ्यांना विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन शासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी देण्याची गरज आहे. सोबत अशा भागात केवळ एकच कामगार उपस्थित न राहता जास्त कामगार असावे. त्यांना लहान ऑक्सिजन मास्क देऊनच उतरवायला हवे. कामाच्या दरम्यान येथे कुणी कामगार चक्कर येऊन विहीर वा टँकमध्ये पडल्यास इतरांनी खाली उतरू नये. खड्डय़ात उतरणाऱ्या कामगारांकडे विशिष्ट सिग्नलिंग यंत्रणा व बेल देण्यासह दोरी बांधून आत सोडण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांना आत अस्वस्थ वाटताच ते त्वरित कळवताच त्यांना बाहेर ओढता येईल.
डॉ. मनीष श्रीगिरीवार,
न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे तज्ज्ञ, नागपूर

प्राचीन पद्धतीचा विसर
पूर्वी कोणत्याही पडित विहिरी वा गटारीत कामगार उतरण्यापूर्वी एका दोरीला बांधून दिवा वा मेणबत्ती पेटवून आत सोडली जात होती,, त्यामुळे आतील प्राणवायूची माहिती कळत होती. हा दिवा वा मेणबत्ती विझल्यास त्यात प्राणवायू नसल्याचे स्पष्ट झाल्यावर विशेष काळजी घेतली जाई, परंतु हल्ली या पद्धतीचा विसर सगळ्यांना पडल्याचे दिसत आहे. म्हणूनच अपघात होऊन आजही जगभरात मोठय़ा प्रमाणवर असले मृत्यू होतात, हे विशेष.

वायूनिर्मितीची कारणे व विषारी घटक
अशा ठिकाणी सुर्यप्रकाश पडत नाही व हवाही खेळती राहत नाही. त्यामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे येथील पाणी व वस्तूंच्या काही घटकांमध्ये कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे येथे हा वायू निर्माण होतो. या वायूत नायट्रोजन, मिथेन, अमोनिया, कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, हायड्रोजन, सल्फर हे घटक आढळतात. त्यात हायड्रोजन सल्फाईड हा सर्वात हानिकारक घटक आहे. तो मानवी शरिरात सायनाईडप्रमाणे विष पसरवतो. अनेक विहिरींमध्ये वीजपंप लावून पाणी ओढले जाते. त्यातून निर्माण होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईड असलेल्या विहिरीत कामगार उतरल्यास येथेही हा अपघात होण्याची शक्यता असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2016 3:20 am

Web Title: indira gandhi government medical college and hospital research on human death
Next Stories
1 तरूण गुंडांमध्ये खंडणीच्या पैशाचे आकर्षण
2 महापालिका झोन सभापतीपदासाठी भाजप सदस्यांमध्ये चढाओढ
3 वन मुख्यालयाला प्रसिद्धी व माहिती अधिकारी मिळाला, पण..
Just Now!
X