महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यासह १९ नवीन करोनाग्रस्त;  शहरातील रुग्णसंख्या साडेपाचशे पार

नागपूर :  महापालिकेच्या एका आरोग्य कर्मचाऱ्यांसह आणखी १९ जणांना करोना विषाणूची बाधा असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील एकूण बाधितांच्या संख्येने साडेपाचशेचा टप्पा ओलांडला आहे. प्रथमच येथील इंदोरा आणि वाठोडातील गोपालकृष्ण नगरात बाधिताची नोंद झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली असून हे दोन्ही परिसर महापालिकेकडून सील करण्यात आले आहेत.

करोनाबाधित आढळलेला आरोग्य कर्मचारी पूर्वी करोना प्रतिबंधित सतरंजीपुरा परिसरात कार्यरत होता. तो महापालिकेच्या  इमारतीतही साथरोग विभागात सेवा देत होता. त्याला सर्दी, खोकला, तापासह इतर लक्षणे असल्याचे बघत मेयो रुग्णालयात हलवण्यात आले. चाचणीत त्याला विषाणूची बाधा असल्याचे स्पष्ट होताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.

तो वाठोडा परिसरातील गोपालकृष्ण नगर येथील रहिवासी आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने त्याच्या पत्नीसह इतर अशा ५२ जणांना  विलगीकरणात घेतले.  इंदोऱ्यात प्रथमच एका रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे येथील सुमारे ५२ व्यक्तींना विलगीकरणात घेण्यात आले.

मोमीनपुरा परिसरात ८, भानखेडा परिसरातील १, जुनी मंगळवारी परिसरातील १, नाईक तलाव- बांग्लादेश परिसरातील २ व्यक्तींनाही करोना असल्याचे निदान झाले. सगळ्यांना  मेडिकल, मेयो, एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आज सोमवारी मेडिकलमधून २, मेयोतून २ अशा चौघांना सुट्टी झाली. आजपर्यंत एकूण ३८५ जण करोनामुक्त झाले तर ११ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आमदार निवासातील १२ जणांची चाचणी

आमदार निवास विलगीकरण केंद्रातील एका डॉक्टरसह दुसरा आरोग्य कर्मचारी बाधित आढळल्याने रविवारी येथील सुमारे चार ते पाच जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यांचे नमुने नकारात्मक आले असले तरी घाबरलेल्या इतर डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी अशा १२ जणांचे नमुने सोमवारी  घेण्यात आले. यापैकी काहींचे नमुने रात्री नकारात्मक आले. काहींचे अहवाल रात्री उशिरापर्यंत आले नव्हते.

नगरसेवक विलगीकरणात?

महापालिकेतील करोनाबाधित आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या एका नगरसेवकावरही विलगीकरणात जाण्याची पाळी येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. परंतु रात्री उशिरापर्यंत त्यावर निर्णय झाला नव्हता. हा कर्मचारी महापालिका इमारतीतील साथरोग विभागातही सेवा देत होता. त्यामुळे येथीलही कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना धडकी भरली असून येथील कुणी संपर्कात आला असल्यास त्यालाही विलगीकरणात घेतले जाणार आहे.