वर्षभरात केवळ तीन कंपन्यांची जमीन खरेदी; रोजगाराच्या संधीचे स्वप्न हवेतच

मिहान-सेझ या शहरातील महत्त्वाकांक्षी व्यावसायिक प्रकल्पांचे आकर्षण आता कमी व्हायला लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष प्रयत्न केल्याने प्रारंभी काही उद्योजकांनी मिहान-सेझमध्ये गुंतवणुकीसाठी रूची दाखवली, परंतु आता उद्योगांचा ओघ आटला आहे. या प्रकल्पात गेल्या वर्षभरात केवळ तीन कंपन्यांनी जमीन खरेदी केली आहे.

मिहान-सेझ हे प्रकल्प रोजगाराच्या दृष्टीने विदर्भातील युवकांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरतील, असे सांगण्यात येत होते. केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर येथे मोठे उद्योगधंदे यावे यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे २०१५ ते २०१७ या काळात काही उद्योजकांनी येथे गुंतवणूक केली. काहींनी शंभर ते दीडशे एकर जमीनही खरेदी केली.

यातील काही कंपन्यांनी जमिनी खरेदीचा करार केला, परंतु त्यासाठी भरावी लागणारी १० टक्के रक्कम भरली नाही. एक ते दीड वर्षांनी यातील मोठे भूखंड घेणाऱ्या कंपन्यांनी रक्कम जमा केली, परंतु गेल्या आर्थिक वर्षांत नवीन कंपन्यांनी जमीन घेतल्याचे दिसून येत नाही. एम.ए.डी.ने १ जूनला अपग्रेड केलेल्या माहितीनुसार, नोव्हा इन्झो पॉलिमर्स प्रा.लि.ला २.७६० एकर आणि १.६७७ एकर जमीन १७ जुलै २०१७ वाटप करण्यात आली. एन्क्रो लाईफ सायन्स (इंडिया) प्रा.लि.ला २ एकर जमीन ४ मे २०१८ ला सोपवण्यात आली. हारमन फिनोचे लि.ला ५० एकर जमीन २० सप्टेंबर २०१७ ला वाटप करण्यात आले, परंतु एमडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांना हे मान्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आर्थिक वर्षांत १८ कंपन्या येथे आल्या आहेत.

२०१६-१७ मध्ये जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु २०१७-१८ या आर्थिक वर्षांत या कंपन्यांनी रक्कम भरली. त्यानंतर त्यांना जागेचा ताबा देण्यात आला. मोठे भूखंड घेतलेल्या कंपन्यांमध्ये रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लि.ला १०४ एकर जमीन २७ सप्टेंबर २०१५ वाटप करण्यात आले. या जमिनीची रक्कम १३ जुलै २०१७ ला भरली.

पतंजली समूहाला सेझमध्ये १०६.५७ एकर जमीन १६ नोव्हेंबर २०१६ ला देण्यात आली. पतंजलीने एका वर्षांनंतर जमिनीची दहा टक्के रक्कम भरली. इंडो यूके समूहाला १५३ एकर जमीन १६ नोव्हेंबर २०१६ मिळाली. त्यानंतर या कंपन्यांनी पुढील काही महिन्यांनी जमिनीची रक्कम भरली.

गेल्या आर्थिक वर्षांत एकूण १८ कंपन्यांनी मिहान-सेझमध्ये जमीन खरेदी केली. त्यापैकी चार कंपन्यांनी २०१६-१७ पासून जमीन खरेदी प्रक्रिया सुरू केली होती. त्यांना २०१७-१८ या आर्थिक वर्षांत जमिनीचा ताबा देण्यात आला. या सर्व कंपन्यांना मिळून ७४४ एकर जमीन वाटप करण्यात आली. १४ कंपन्यांनी ही सर्व प्रक्रिया गेल्या आर्थिक वर्षांत केली आहे. याशिवाय मध्यवर्ती सुविधा इमारतीमध्ये नऊ आयटी कंपन्यांना जागा देण्यात आली. अशा एकूण २३ कंपन्या गेल्या वर्षभरात आल्या. त्यापैकी १३ कंपन्यांचे काम सुरू झाले आहे.   – सुरेश काकाणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमएडीसी

गेल्या आर्थिक वर्षांत आलेल्या कंपन्या

  • नोव्हा इन्झो पॉलिमर्स प्रा.लि.ला २.७६० एकर आणि १.६७७ एकर जमीन १७ जुलै २०१७ हस्तांतरित करण्यात आली.
  • एन्क्रो लाईफ सायन्स (इंडिया) प्रा.लि.ला २ एकर जमीन ४ मे २०१८ ला हस्तांतरित करण्यात आली.
  • हारमन फिनोचे लि.ला ५० एकर जमीन २० सप्टेंबर २०१७ हस्तांतरित करण्यात आली.